पर्यटक, भाविकांना लुटणाऱ्या तिघांना अटक 

पाच गुन्ह्यांची कबुली : तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर – पन्हाळा, जोतिबा आणि गगनबावडा रोडवर पर्यटक, भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमारी करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीच्या मुसक्‍या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी, सोन्याचे दागिने, 13 मोबाईल, दोन शस्त्रे असा सुमारे तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

लुटारुंनी चार लुटमारी आणि एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयित योगेश ऊर्फ गोपी राजेश गागडे (वय 22, रा. शिंगणापूर, ता. करवीर), रियाज नबी तांबोळी (19, रा. गणेशनगर, शिंगणापूर), सोहेल उर्फ जॉन्टी राजू मांगलेकर (22, रा. संकपाळ नगर, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत.

दसरा सणाच्यावेळी बाळासाहेब ज्ञानदेव शिंदे हे पत्नीसह दुचाकीवरून पहाटे जोतिबाला देवदर्शनासाठी जात असताना त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमारी केली होती. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बाळासाहेब शिंदे यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा करीत असताना समोरून रोडने आलेल्या दुसऱ्या गाडीची लाईट दिसल्यावर आरोपींनी पळून जाताना ऐकमेकाला गोप्या, गोट्या तसेच जॉन्ट्या या नावाने हाक देऊन पळून गेल्याची माहिती दिली.

त्यानुसार चौकशीमध्ये भरदिवसा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 16 लाखांची लुटमार करणारा सराईत गुन्हेगार योगेश ऊर्फ गागडे याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने लुटमारी केल्याची माहिती मिळाली. संशयित गोपी गागडे हा रविवारी आपल्या दोन साथीदारांना दुचाकीवरून शिंगणापूर येथील म्हसोबा मंदिर परिसरात आल्याचे समजताच पथकाने त्यांना पकडले. त्यांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये दोन मोबाईल मिळून आले. दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)