1 रुपया नाममात्र दराने 30 वर्षांच्या मुदतीने दिल्या 3 हजार 14 चौरस मीटर जागा
पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांना पुणे महापालिकेच्या 3 हजार 14 चौरस मीटर जागा विनानिविदा भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून या जागा मंगळवारी महामेट्रोकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत.
मार्च 2019 मध्ये या जागा महामेट्रोला देण्यास महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली होती. त्यानंतर मंगळवारी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत या जागा मेट्रोकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त अनिल मुळे यांनी दिली. या जागांमध्ये कोथरूड, शिवाजीनगर, सबर्बन, पुणे स्टेशन येथील उद्यानमधील एकूण 17 जागांचा समावेश आहे. या जागा महामेट्रोला 30 वर्षे कराराने 1 रुपया दराने देण्यात येणार आहे. त्यात मेट्रो स्टेशनचे एन्ट्री-एक्झिट, लिफ्ट, फुट ओवर ब्रीज वापराकरिता कायमस्वरुपी उभारले जाणार आहेत.
मेट्रोच्या कामाची तातडी आणि उपयुक्तता विचारात घेत महापालिकेच्या मालकीच्या जागा महामेट्रोला त्वरीत उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने महापालिकेच्या मालकीची जागा किमान चालू बाजारभावाने भाडेपट्टा अथवा विक्री करून देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मिळकत वाटप नियमावली वगळता कोणत्याही मिळकतींचा विनियोग जाहीर निविदा मागवून करण्यात यावा, असे नमूद आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. त्यानुसार महामेट्रोने महापालिकेच्या मालकीच्या पहिल्या टप्प्यातील एकूण 17 जागा मागितल्या होत्या. त्यास अखेर मुख्यसभेने मान्यता दिल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करून या जागा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.