यंदा इंदापूरची आमदारकी अकलूज ठरवणार?

नीरा काठ परिसरात मोहिते-पाटलांचा करिष्मा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील बडा नेता भाजपच्या गळाला लागणार?

– नीलकंठ मोहिते

रेडा – इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तब्बल अर्धा डझन उमेदवार यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. कॉंग्रेसकडून फक्‍त माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. आमदार दत्तात्रय भरणे हे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने व राज्यात- देशात कॉंग्रेससोबत आघाडीचा धर्म पाळण्याचे धोरण निश्‍चित झाल्यामुळे इंदापूरात राष्ट्रवादीला उमेदवारी मिळणार नाही, असे संकेत मिळत आहेत. तरी यातीलच एखादा ताकदवान नेता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये खेचून घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इंदापूरची आमदारकी यंदा अकलूज ठरवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताकदीचा तालुका म्हणून राज्यात इंदापूरकडे पाहिले जाते. आमदार भरणे यांनी राज्यात भाजपची सत्ता असताना इंदापूरच्या विकासासाठी स्वतःची क्रेझ वापरून कोट्यवधीचा निधी आणून कामे मार्गी लावली आहेत. याच विकासकामांना सुबत्तेची झालर देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातील कामे दमदारपणे सुरू ठेवली आहेत. इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर आता सभापती अप्पासाहेब जगदाळे, सभापती प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासाठी या इच्छुकांनी प्राथमिक तयारी सुरू केली आहे.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळण्याचे धोरण ठेवले असल्यामुळे मागील सात महिन्यांपासून इंदापूर तालुक्‍यात वेगळीच हवा दिसत आहे. यात खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्‍य मिळण्यासाठी माजी मंत्री पाटील यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांना पुणे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मताधिक्‍य मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या टीमने खंबीर साथ दिली. त्यामुळे आघाडी धर्माचे तंतोतंत पालन या कृतीतून दिसून आले. तरी आमदारकीची तयारी हर्षवर्धन पाटील, आमदार भरणे, अप्पासाहेब जगदाळे, माने यांनी ग्राउंड लेव्हलपासून सुरू केली आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या अकलूज साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रात इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदीच्या परिसरातील वीस-बावीस गावे आहेत. तसेच इतर तालुक्‍याच्या भागात देखील मोहिते-पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना इंदापूर तालुक्‍यातील राजकारणात फेरबदल करीत नव्हते. मोहिते-पाटील यांनी इंदापूर तालुक्‍यात भाजपची ताकद नसताना देखील केवळ काही भागात भेटी दिल्यामुळे भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी अपेक्षित मतदान घेतले.

22 गावांना पाणीप्रश्‍नांची भुरळ
माळशिरस तालुक्‍याच्या सीमेवर असणाऱ्या इंदापूर तालुक्‍यात मोहिते पाटील यांनी काही महिन्यापासून लक्ष केंद्रीत केले आहे. 22 गावांना शेतीचे पाणी मिळत नाही. त्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घालण्यासाठी मोहिते पाटील समर्थकांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले. तसेच आमच्या 22 गावांचा पाणी प्रश्‍न मार्गी लावा. आपलाच आदेश अंतिम असेल, असा शब्द नागरिक, शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे पाण्यापासून उपेक्षित असणाऱ्या गावातील मतांचे गठ्ठे हे मोहिते-पाटलांच्या इशाऱ्यावर फिरणार आहेत. मागील आठवड्यात मोहिते पाटील यांनी इंदापूर तालुक्‍यातील चारा छावण्यांना व शेतकऱ्यांशी संवाद साधत पहिला दौरा पूर्ण केला. त्यामुळे मोहिते-पाटील यांची इंदापूर तालुक्‍यात सातत्याने होत असणारी एंट्री राष्ट्रवादी व कॉंग्रेसला डोईजड होणार आहे. इंदापूर तालुक्‍यात खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. यातीलच तगड्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा डाव मोहिते-पाटील गटाकडून टाकला जात असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

तालुक्‍यात बिघाडी
राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्षांची आघाडी राजकीय खेळी करण्यासाठी झाली आहे. मात्र, इंदापूर तालुक्‍यात आतापर्यंतचे चित्र वेगळे आहे. जर आघाडी होणार असेल तर ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार की कॉंग्रेसला मिळणार, याबाबत ठोस निर्णय झाला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)