यंदा मे महिना ठरला ‘सुपर’हिट

अखेरचा आठवडा आला, तरी उकाडा कायम

पुणे – मे महिना हा उन्हाळ्यातील थोडा दिलासा देणारा ठरतो. 15 मेनंतर मान्सूनचे वारे वाहू लागतात आणि तापमानात घट होते. पण यंदा मात्र मेचा अखेरचा आठवडा आला, तरी अद्याप तापमानाच पारा कमी होण्याचे कुठलेही संकेत दिसत नसल्याने यंदा मे सुद्धा सर्वाधिक “हिट’ गेला असेच म्हणावे लागेल.

साधारणत: भारतात फेब्रुवारी ते मे असे 4 महिने उन्हाळा असतो. त्यात सर्वाधिक कडक ऊन एप्रिलमध्ये असते. मेमध्ये उन्हाळा थोडा दिलासादायक होतो. पण, यंदा अनेक भागात चित्र उलटे आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमान 40 ते 46 अंशादरम्यान असल्याने उष्णतेची लाट आली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिकच वाढत असल्याने वाऱ्याची झुळकही गरम भासत आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी 8 वाजल्यापासूनच उन्हाचा ताप वाढत असून सायंकाळी 6 वाजल्यानंतरही उन्हाच्या झळा कायम अनुभवायला येत आहे. सोमवारी (27 मे) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये नागपूर व वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

उष्णतेची लाट अजूनही कायम
विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान 43 अंशांच्या पुढे आहे. यात बह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे तापमान 45 अंशांपेक्षा अधिक आहे. तर मराठवाड्यातील परभणी येथे 46. अंश, नांदेड 44.5 अंश तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे 43.1 जळगाव येथे 42.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर गुरुवारपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यातही तापमानाचा पारा गेल्या दोन दिवसांपासून थोडा कमी झाला आहे. गेला महिनाभर 40 अंश आणि त्यापुढेच हे तापमान होते. दरवर्षी मेमध्ये पुण्यात सरासरी तापमान 37 अंश सेल्सिअस असते. पण यंदा ते चाळिशीच्या खाली आलेच नाही. सोमवारीदेखील तापमान 38 अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे पुणेकरांना यंदाचा मे महिना “ताप’दायक गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)