तरुणी का त्रस्त आहेत गुडघ्याच्या आर्थरायटिसने? (भाग १)

महिलांना होणाऱ्या गुडघ्याच्या आर्थरायटिसचे प्रमाण वाढलेले असून, अलीकडे स्पष्ट झालेल्या ट्रेंडनुसार तरुण महिलांना गंभीर स्वरूपाचा आर्थरायटिस आणि वेदना होण्याचे प्रकार वाढले आहेत. मध्यम स्वरूपाचा वा गंभीर स्वरूपाचा आर्थरायटिस असलेल्या 15% महिलांचे वय 45 च्या खाली आहे आणि हे निश्‍चितच गंभीर आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार हृदयविकार, कर्करोग आणि एड्‌स यासारख्या प्रचंड प्रमाणात आढळणाऱ्या रोगांना पिछाडीवर टाकून ऑस्टिओ आर्थरायटिस हा पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार होणार आहे. पुढील काही वर्षात तरुणांना होणारा ऑस्टिओ आर्थरायटिस ही चिंता वाढवणार आहे.
ऑस्टिओआर्थरायटिसची कारणे अजूनही पूर्णपणे समजलेली नाहीत. आनुवंशिक रचना, स्थूलपणा, जीवनशैली, आहाराच्या सवयी, इजा आणि बायोमेकॅनिक्‍सवर झालेला परिणाम यांची महत्त्वाची भूमिका असते. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागांमध्ये ऑस्टिओ आर्थरायटिसचे प्रमाण अधिक असते, असे दिसून आले आहे. आहाराच्या बदललेल्या सवयी, प्रदूषण आणि अधिक बैठी जीवनशैली यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात ही तफावत आढळून येते. या घटकांचा पुरुषांच्या तुलनेत महिलांवर अधिक परिणाम होऊ शकतो, असे सूचित करण्यात आले आहे आणि त्यांना आर्थरायटिस होण्याची शक्‍यता अधिक वाढते.
महिलांमध्ये स्थूलपणा वाढल्यामुळेसुद्धा ऑस्टिओ आर्थरायटिसचे प्रमाण वाढले आहे. आर्थरायटिस असलेल्या प्रौढांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण हे आर्थरायटिस नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत 54% जास्त असते. इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीनमध्ये 2007 साली प्रकाशित झालेल्या एम. के. शर्मा यांनी केलेल्या रोगपरिस्थितीविज्ञान अभ्यासानुसार आर्थरायटिस आणि स्थूलपणा यांच्यातील संबंध दाखवून देण्यात आला आहे. महिलांना आनुवांशिकतेने आर्थरायटिस होण्याची अधिक शक्‍यता असते. जनुकांमुळे शरीरातील उतींचा दर्जा ठरतो आणि त्यातूनच आर्थरायटिसची सुरुवात होते.
गुडघ्याच्या आर्थरायटिसमध्ये नक्की काय होते? 
गुडघ्याच्या सांध्यांच्या पृष्ठभागाला (जिथे हाडे एकमेकांना स्पर्श करतात) कास्थींचे (मऊ उशी) आवरण असते. हा घटक शॉक ऍबसॉर्बरसारखे काम करतो आणि घर्षण कमी होते. कास्थी हे तुमच्या कारच्या टायरच्या रबरसारखे काम करते. फक्त हे सजीव असते आणि सूक्ष्म प्रमाणातील घर्षणाबाबतही ते अधिक चांगल्या प्रकारे काम करते. आर्थरायटिस झालेल्या रुग्णांमध्ये ही कास्थी पातळ झालेली असते किंवा पूर्णपणे नष्ट झालेली असते. ही परिस्थिती एक्‍स-रेच्या माध्यमातून समोर येऊ शकते आणि हाडांच्या पृष्ठभागामधील पोकळी दिसून येऊ शकते. कास्थी नसल्यामुळे होणाऱ्या घर्षणाने डेब्रिस तयार होतो. परिणामी, सूज येते. त्यामुळे वेदना होतात, हालचालींवर परिणाम होतो आणि सांध्यांचे अजून नुकसान होते.
तरुणी का त्रस्त आहेत गुडघ्याच्या आर्थरायटिसने? (भाग २)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)