हे क्रिकेटचे मैदान नव्हे; इम्रान! (अग्रलेख)

“भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तान केवळ उत्तर देण्याचा फक्‍त विचारच करणार नाही, तर सडेतोड उत्तर देणार, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिली आहे. “भारतात सध्या निवडणुकीचा काळ आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्याची चर्चा भारतात सुरू आहे हे मी समजू शकतो. पण पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नसताना भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात आहे; अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

मुळात पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाच दिवसांनी प्रतिक्रिया देऊन इम्रान यांनी आपल्या असंवेदनशीलतेचे प्रदर्शन केले आहे. तसेच प्रतिक्रिया देताना जी मुक्‍ताफळे उधळली आहेत, ती पाहता त्यांनी भारताला इशारा देण्यापेक्षा पाकिस्तानी जनतेला खूश करण्याचे काम केले आहे, असेच म्हणावे लागते. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या पाठिंब्यावर सत्ता मिळवून पंतप्रधान झालेल्या इम्रान खान यांच्याकडून दुसरी अपेक्षाही नव्हती. पण क्रिकेटच्या मैदानातून राजकारणात आलेल्या इम्रान यांनी मैदान आणि रणभूमी यातील फरक समजून घेण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी (इम्रान खान क्रिकेट खेळत असताना) पाकिस्तानची क्रिकेटच्या मैदानात भारताविरुद्ध दादागिरी होती. पण तीही आता राहिलेली नाही. भारताने पाकिस्तानचे क्रिकेटमधले आव्हान कधीच संपवून टाकले आहे. आता पंतप्रधान इम्रान खान भारताला सडेतोड उत्तर देण्याची धमकी देत असतील, तर त्यांनी प्रथम हे क्रिकेटचे मैदान नव्हे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकतर भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी सामर्थ्याची कोठेच तुलना होऊ शकत नाही.सर्वच बाबतीत भारत पाकिस्तानच्या कितीतरी पट भारी आहे. शिवाय वर्ष 1947 नंतर दोन्ही देशात जी युद्धे झाली त्यापैकी प्रत्येक युद्धात पाकिस्तानला भारताकडून सपाटून मार खावा लागला आहे. वर्ष 1971 च्या युद्धात तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. हा इतिहास माहीत असतानाही इम्रान खान दर्पोक्‍ती करीत असतील तर ती त्यांची राजकीय अपरिहार्यता मानावी लागेल. पाकिस्तानचे बोलभांड लष्करी नेते कायम भारताविरोधात अणुबॉंब वापरण्याची धमकी देत असतात. पण त्यांच्या या दाव्यालाही काही अर्थ नाही हे अनेकवेळा समोर आले आहे.

भारताने आपल्याविरोधात लष्करी कारवाई करू नये म्हणून पाकिस्तान कायम अणुबॉंबचा बागुलबुवा उभा करीत आला आहे. अशी परिस्थिती असतानाही इम्रान खान भारताला धमकी देत आहेत, हे विशेष. तसेच “पाकिस्तानविरोधात पुरावा नसताना भारत आरोप करीत आहे,’ हा इम्रान यांचा कांगावाही चुकीचा आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान अशाप्रकारे अंग झटकण्याचे काम करीतच असतो. खरे तर भारताने आतापर्यंत ढीगभर पुरावे सादर केले आहेत. पण पाकिस्तानने एकदाही कारवाई केलेली नाही. वर्ष 1993 च्या मुंबई बॉंबस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच लपून बसला आहे आणि याबाबतचे सर्व पुरावे भारताने पाकिस्तानला सादर केले आहेत. पण दाऊद अजूनही पाकिस्तानातच वावरत आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानातच आहे. त्याने तर पाकिस्तानची निवडणूकही लढवली होती.

भारताने हाफिज सईदविरोधात पुरावेही पाकिस्तानला दिले असून “त्याच्यावर पाकिस्तानात खटला चालवा अथवा त्याला भारताच्या ताब्यात द्या,’ अशी मागणी केली आहे. पण त्यावरही पाकिस्तानने कोणतीच कारवाई केलेली नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा सर्वेसर्वा अझर मसूदही पाकिस्तानातच आहे. त्याने पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयातून पुलवामा हल्ल्याचे आदेश दिले होते, अशी धक्‍कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो रावळपिंडीतील लष्करी रुग्णालयात उपचार घेत आहे. आजारी असल्यामुळे मसूदला भारताविरोधात वापरण्यात येणाऱ्या युनायटेड जिहाद कौन्सिल बैठकांना हजेरी लावता आली नव्हती.

पुलवामा हल्ल्याच्या आधी आठ दिवस अझहरचे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होते. तेव्हा मसूदने त्यांच्यासाठी आजारी आवाजामध्ये संदेश ध्ननिमुद्रित केला होता. त्याची ऑडिओ क्‍लिपही समोर आली आहे, याची कल्पना इम्रान खान यांना नसेल असे म्हणता येणार नाही. मसूदवर आणि त्याच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आतापर्यंत जागतिक पातळीवरही अनेकदा करण्यात आली आहे, हेही पाकिस्तानने लक्षात घेण्याची गरज आहे. आता मसूदवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव फ्रान्स सरकार संयुक्‍त राष्ट्रसंघात मांडणार आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत फ्रान्स सरकार हा प्रस्ताव संयुक्‍त राष्ट्रात आणणार आहे.

मसूदवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्याची संयुक्‍त राष्ट्रसंघात ही दुसरी वेळ आहे. याआधी अमेरिकेने पाकिस्तानी दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अमेरिकेच्या या प्रस्तावाला ब्रिटनने पाठिंबा दिला होता. मात्र, चीनने घातलेल्या खोड्यामुळे संयुक्‍त राष्ट्रांमध्ये तो प्रस्ताव संमत होऊ शकला नाही. सारे जग ज्याला दहशतवादी मानत आहे त्याच्यासाठी पाकला आणखी कोणते पुरावे हवेत? जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली हा पुरावा इम्रान खान यांच्यासाठी पुरेसा नाही का? एकूणच इम्रान खान यांनी भारताला दिलेली धमकी म्हणजे भारताच्या क़ठोर धोरणामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचा पुरावा आहे. रणभूमी आणि क्रिकेटचे मैदान यातील फरक इम्रान खान यांना समजावून सांगण्याची हीच योग्य वेळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)