‘हा’ खेळ आयुष्याचा खेळखंडोबा करणारा

आयुष्यामध्ये माणसाला एका वेगळ्या भावविश्‍वात रमायला, तिथे जगायला आवडत असते. मात्र, हे भावविश्‍व आदर्शवादाच्या गराड्यात आणि वास्तवतेपासून कोसो मैल दूर असते. तरी याचा जाणीवपूर्वक अट्टाहास केला जातो, कारण इथे माणसाला आपल्या असण्याची जाणीव राहिलेली नसते. इथे असतो केवळ त्या संबंधित विश्‍वात स्वत:ला अधिक गुंतवत ठेवत जगण्याचा अवास्तव नाटकीपणा! यातून अंत हा निश्‍चित असतो. असेच एक तरुणाईच्या मानगुटीवर अधिराज्य गाजविणारे जग म्हणजे पबजी!

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पालकाने प्रश्‍न विचारला होता की, माझा मुलगा आधी अभ्यासात चांगला होता. पण हल्ली तो ऑनलाइन गेम्समध्ये रमू लागल्याने त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, यावर तोडगा काय? यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, तो पबजी खेळतो का? यावरून या विषयाची आपल्याला व्याप्ती लक्षात येते.

भिवंडीमध्ये पबजी खेळण्यापासून रोखल्याचा राग आल्यामुळे लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. पबजी मधील मिशन पूर्ण करण्यासाठी चार मुले घरातील एक लाख रूपये घेऊन भर रात्री घर सोडून पळून गेली. नवरा पबजी या गेममध्ये अधिक मग्न असल्याकारणाने तो आपल्याला वेळ देत नाही, अशी तक्रार करीत एका महिलेने नवऱ्याला घटस्फोट दिला. पबजी खेळता येईल असा मोबाईल पालक घेऊन देत नाहीत म्हणून एका तरूणाची आत्महत्या! अशा असंख्य बातम्या दररोज वर्तमानपत्रातून आपल्या समोर येत आहेत.

पबजी या ऑनलाइन गेमने अक्षरश: सगळ्या वयोगटातील व्यक्तींना वेड लावले आहे. अठरा अठरा तास हा गेम खेळला जात आहे. यामध्ये ना स्वत:च्या असण्याची जाणीव आहे, ना जेवणाची, ना आपल्या आयुष्याची! पबजीवर बंदी घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये काहींना यशही मिळाले आहे. मात्र, हा गेम चालू ठेवण्यामागे अर्थकारणही आहे. या गेमने गतवर्षी 700 मिलियन डॉलर्स कमावले आहेत. जगामध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा गेम आहे. 50 कोटी पेक्षा अधिक वेळा हा गेम डाऊनलोड करण्यात आलेला आहे. शहरातच नाही तर खेडयापाडयातील तरुणदेखील पबजीच्या वेडापायी तहान भूक विसरून गेले आहेत. पबजी म्हणजे..? या प्रश्‍नाचे उत्तर एक कोटी लोकांनी पबजी म्हणजे आयुष्य आहे, असे दिले. या एका गेमने लोकांच्या आयुष्याची जगण्याची समीकरणे बदलली आहेत. ब्लू व्हेल, पोकेमन गो या काही खेळांनी आधीही समाजामध्ये अडचण निर्माण केली होती. मात्र, पबजीने दुरावत चाललेले नातेसंबंध, नैराश्‍य, ताण-तणाव, अभ्यासातील येणारे अपयश या सगळ्या गोष्टींना हत्यार बनवून एक आभासी युद्धभूमी निर्माण करीतयुद्ध छेडले आहे. यातून मग आत्महत्या आणि नैराश्‍य या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने गेमिंग डिसऑर्डर याला आजार म्हणून घोषित केलेले आहे. जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय संस्था गेमच्या वाढणाऱ्या प्रभावातून उदभवणाऱ्या आजारांवर संशोधन करीत आहेत. पालकांनी मुलांच्या करिअरचे समुपदेशन घ्यायचे की मुलांना पबजी पासून वाचविण्याचे, हाच मुळात प्रश्‍न निर्माण झाला आहे. मैदानी खेळ हे मैदानावर जाऊन खेळणे अपेक्षित आहे. मात्र, आजची पिढी ते मोबाईलवर खेळत आहे. पालक आणि पाल्य यांच्यातील संवादाची दरी कमी व्हावी. संवाद वाढत अभ्यास आणि मुलांचा सर्वांगीण विकास याकडेही पालकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध नसणारी मैदाने याही प्रश्‍नाचा या अनुषंगाने विचार करणे भाग आहे. अवास्तव दुनियेपासून सावरत, सामाजिक आणि माणूस म्हणून आपल्या असणाऱ्या जाणीवा जागृत ठेवण्यासाठी आपणा सगळ्यांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अन्यथा, उद्याचे युद्ध हे पबजीच्या रणांगणावर झाल्यावाचून राहणार नाही.

– श्रीकांत येरूळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)