हा खेळ सावल्यांचा 

अश्‍विनी महामुनी

मी लहान, दुसरी-तिसरीत असताना माझ्या वडिलांचे एक मित्र आमच्या घरी नेहमी यायचे. घरी आल्यानंतर ते आम्हा भावंडांच्यातच जास्त मिसळायचे. ते आमच्याबरोबर खेळायचे, आम्हाला जादू करून दाखवायचे, शिकवायचे. कागदाच्या विविध वस्तू, विमान-बोटींपासून ते पशु-पक्षी, फुले-झाडे करून दाखवायचे. त्यामुळे ते आमच्या चांगलेच लक्षात राहिले. सतीश कोरे नाव होते त्यांचे. पूर्वी ते नेव्हीत होते, नेव्हीतून निवृत्ती घेतल्यानंतर माझ्या वडिलांच्या कंपनीत आले. आम्ही त्यांना काका म्हणायचो. एकदा माझे मामा आमच्याकडे आले होते. तेव्हा “हे कोण?’ म्हणून त्यांनी विचारल्यावर “हे कोरे काका’ असे मी सांगितले. “कोरे काका’ हे माझे उत्तर ऐकून ते गमतीने म्हणाले, “कोरे काका काय? माझे फक्त नावच कोरे आहे. मी कोरे काका नाही बरं का, माझ्या अंगी नाना कळा आहेत.’ आणि खरोख्ररच त्यांच्या अंगी अनेक कळा होत्या. ते आम्हा मुलांमध्ये जितक्‍या सहजपणे आणि आमच्यातील एक होऊन मिसळायचे, तेवढ्याच सहजपणे ते माझ्या आजोबांशीही गप्पा मारायचे. देवाधर्माच्या आणि त्यांच्याबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडूनही बसायचे. ते मात्र आम्हाला आवडत नसे. कारण ते एकदा आजोबांबरोबर बुद्धिबळ खेळायला बसले, की चारदोन तास दोघेही हलत नसत. मग आम्हाला कंटाळा येई.

-Ads-

एकदा संध्याकाळच्या वेळी ऑफिस सुटल्यावर ते आले होते, तेवढ्यात लाईट गेली. लगेच वडिलांनी मेणबत्त्या लावल्या. लाईट गेली म्हणून कंटाळा येण्याऐवजी कोरे काका उत्साहाने आम्हा भावंडांना म्हणाले, चला मी तुम्हाला गंमत करून दाखवतो आणि त्यांनी ती मेणबत्ती स्टुलावर ठेवली आणि तिच्यासमोर हात धरून भिंतींवर सावल्यांचा खेळ सुरू केला. त्यांनी हाताच्या बोटांच्या सावलीचा कुत्रा करून दाखवला, ससा करून दाखवला, हरीण करून दाखवले, टोपी घातलेला आणि पगडी घातलेला माणूस केला, पंख हलवत उडणारा पक्षी करून दाखवला आणि शेंडीवाला माणूसही करून दाखवला. त्यांचा तो सावल्यांचा खेळ पाहायला माझे वडील आणि आजोबाही मोठ्या उत्सुकतेने येऊन उभे राहिले. त्यांना मोठे कौतुक वाटले.

आता या गोष्टीला सहजच 20-22 वर्षे झाली आहेत. पण मला आजही ते कोरे काका आणि त्यांचा तो सावलीचा खेळ चांगलाच आठवतो. कधी मी माझ्या मुलाला ससा, हरीण, कुत्रा, पोपट अशा सोप्या सोप्या आकृती करून दाखवते सावल्यांचा. तो ही प्रयत्न करतो. त्या दिवशी त्याने मलाच सावल्यांचा एक थक्क करणारा खेळ दाखवला. आजवर मी सावल्यांची ठोकळेबाज चित्रेच पाहत आले. पण सावलीचा खेळ करणाऱ्या त्या अनामिक कलाकाराने कमालच करून दाखवली.

सावलीतून त्याने चक्क माणसे उभी केली. सहजपणे ओळखता येणारी. त्याच्या सावलीच्या खेळातसमोर लावलेल्या पडद्याच्या एका कोपऱ्यात एखाद्या परिचित थोर व्यक्तीचे चित्र यायचे आणि तो तेच चित्र व्यक्ती सह्गजपणे ओळखता यावे इतक्‍या बारकाव्यांसह अगदी स्पष्टपणे सावलीने करून दाखवायचा. केवळ दोन हातांच्या सावलीने. एखाद्या जादूगारासारख्या त्याच्या हातांच्या सफाईदार हालचाली मधूनच दाखवल्या जात होत्या.

यात त्याने सहज ओळखता येणारे जिरेटोप आणि दाढी असलेल्या शिवाजी महाराजांचा चेहरा करून दाखवला. मग महाराणा प्रताप केले, झाशीची राणी लक्ष्मीबाई दाखवली, राजा राममोहनरॉय, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्रीजी, लोकमान्य टिळक, शहीद भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, रविंद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन, आणि महात्मा गांधी. प्रथम त्यांचा चेहरा आणि मग हाती काठी घेऊन ती टेकत टेकत चालणारे पाठमोरे महात्मा गांधी. सारी कमालच होती. आणि शेवटी तर त्याने घोड्यावर बसून दौडत जाणारे शिवाजी महाराज दाखवले तेव्हा सर्वांबरोबर आम्हीही टाळ्या वाजवल्या.
सावल्यांचा तो खेळ बघत असताना आम्ही अगदी गुंग झालो होतो.

खेळ संपल्यानंतर आपण सावलीकडे किती दुर्लक्ष करतो याची जाणीव झाली. सावलीचे महत्त्व आपल्याला जाणवते, ते ग्रहणाच्या दिवशी. परवा चंद्रग्रहण पाहताना मुलेच मला सांगत होती, की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते म्हणून चंद्रग्रहण होते. खरे आहे. ही गोष्ट आम्हाला आमच्या लहानपणी माहीत नव्ह्ती आणि सांगून पटलीही नसती. राहू सूर्याला आणि केतू चंद्राला गिळतो तेव्हा ग्रहण होते हेच आमच्या डोक्‍यात पक्के बसलेले. सावली बाबत एक कविता अचानक आठवली- ऊन सावल्यांच्या खेळात एकदा ऊन रुसलं सर्वांना तूच आवडतेस, माझं कौतुकच नाही कसलं तेव्हा सावली म्हणाली, कळले नाही कसे तुला? तू आहेस म्हणून मी आहे मी नाहीच कधी तुझ्याविना, तू आहेस म्हणून मी आहे……… किती खरे आहे! सावलीला स्वतंत्र अस्तित्वच नाही.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)