यंदा भाईयों और बहनोंचा ट्रेंड?

– रोहन मुजूमदार

कांद्यात कांदा, नासका कांदा … यांना बोचक्‍यात बांधा’, ताई-माई अक्का, विचार करा पक्का ..वर मारा शिक्‍का’, येऊन येऊन येणार कोण ..शिवाय दुसरा कोण’ अशा निवडणूक काळातील घोषणा आता लवकरच कानी पडणार आहेत. मात्र, यंदा पंतप्रधान मोदींचे “भाईयों और बहनों’ हे वाक्‍य प्रचलित होण्याची शक्‍यता अधिक आहे. कारण, मोदी जेव्हाही याच वाक्‍याने भाषणाला सुरुवात करतात त्यावेळी नागरिक टाळ्या वाजवून दाद देत असल्याने यंदा मोदींच्या “भाईयों और बहनों’चा ट्रेंड असण्याच्या शक्‍यता आहे.

निवडणूक लोकसभेची की ग्रामपंचायतची, मतदारांपर्यंत पोहोचण्यास वेगवेगळ्या प्रचारतंत्राचा अवलंब केला जातो. 15 वर्षांपूर्वी संपर्काची साधारण साधने असताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून बॅनर, पॅम्प्लेट, स्पीकरगाड्यांचा वापर केला जाई. गावातून, गल्लीतून प्रचारफेरी काढत घोषणांची राळ उडवली जाई. पण त्यात प्रतिस्पर्धी उमेदवाराची अवहेलना होणार नाही याची दक्षताही घेतली जाई. मात्र, आता आचारसंहितेची बंधने व प्रचाराला मर्यादित कालावधी यामुळे प्रचाराच्या काही पारंपरिक पद्धती कालबाह्य होत असून संपर्काची आधुनिक साधनांद्वारे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांशी संपर्क राखण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. सोशल मीडियातील व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकने काही क्षणात लाखो मतदारांपर्यंत सहज पोहोचता येते. याचा उमेदवारांनी वापर सुरू केला आहे. या साधनातून मात्र उमेदवारांच्या समर्थकांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या चांगल्या गुणांचा, कामांचा प्रसार करण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर निंदानालस्ती आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्याचेच धोरण अवलंबले आहे. कार्यकर्तेही आलिशान गाड्यांशिवाय प्रचारात उतरत नसल्यामुळे प्रचाराचा बाजही बदलला असला तरी

मागील काही वर्षांत सर्वच पक्षांना सत्तेची संधी मिळाल्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांची चंगळ झाली. त्यांचा थाटही पालटला. नेत्यांपुढे घोषणा द्यायच्या, नेत्याची पाठ फिरली की आपल्या उद्योगाला लागायचे, असा व्यावहारिक राजकीय उद्योग तेजीत आल्यामुळे निवडणुका महागड्या झाल्या असल्या तरी पारंपरिक आणि आधुनिक घोषणांची सांगड घालत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची राळ उठणार आहे. तसेच या घोषणांमध्ये दिवसांगणिक भरही पडत आहे. त्यात यंदा मोदी “फिव्हर’ नसला तरी त्यांच्या “भाईंयो और बहनों’ या वाक्‍याचा “फिव्हर’ यंदाच्या निवडणुकीत “जोर’ राहण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यासाठी “वेट अँड वॉच’ची भूमिका बजावावी लागेल.

यंदा राजकारणातील “नकला’ गाजणार
राजकारणातील काही मातब्बर नेते नक्‍कला करण्यात माहिर असल्याचे लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी झालेल्या सभांमध्ये आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे. या नेत्यांच्या नकलांमुळे उपस्थित मतदारांची चंगळ होत असून त्यांच्या या “नकला’ सोशल मीडियावरही “फेमस’ झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकभेत “मोदीं’च्या भाषणाची स्टाईल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बेंबीच्या देठापासूनचे “भाषणा’च्या नकला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अत्यंत हुबेहूब करीत असल्याने ते राजकारणी आहेत की एखादे अभिनेते आहेत असा प्रश्‍नही काहीवेळा मतदारराजाला पडतो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आणखी काही नकलाकार राजकारणी आपल्या अनुभवायला मिळणार यात काही दुमत नाही. मात्र, या नकलांमुळे नागरिकांचे मनोरंजन अधिक होते ही जमेची बाजू म्हणावी लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)