निवडणुकीवर नजर तिसऱ्या डोळ्याची

वाई  – लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी वाई विधानसभा मतदार संघात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती सह निवडणूक अधिकारी संगीता राजापूरकर-चौगले यांनी दिली. सर्व मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून 3 संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. काही मतदान केंद्रांवर वेबकास्ट कॅंमेरे लावण्यात आले असून त्यामाध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

वाई खंडाळा महाबळेश्‍वर या तीन तालुक्‍यांचा सामावेश असलेल्या या मतदार संघात 1 लाख 66 हजार 758 पुरुष व 1 लाख 63 हजार 361 महिला आशा 3 लाख 30 हजार 119 एकूण मतदारांचा सामावेश आहे. यामध्ये 2218 दिव्यांग मतदार असून त्यापैकी 1483 अस्तिव्यंग मतदार आहेत. वाईत 191, महाबळेश्‍वर 128, खंडाळा 131 असे 450 मतदार केंद्र आहेत. त्यापैकी वाई तालुक्‍यात जांब व कोंढवली बु. तसेच खंडाळा तालुक्‍यात खंडाळा अशी 3 संवेदनशील केंद्र व महाबळेश्‍वर तालुक्‍यात 40 केंद्र दुर्गम भागात आहेत.

प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, व एक सेवक अशा एकूण 2475 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 850 महिला कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. तसेच 495 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी तिन्ही तालुक्‍यातील तहसीलदार, पाच नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली 88 झोनल अधिकारी, 3 गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर शिस्त राखण्यासाठी आलेल्या मतदारांना रांगेत उभे करणे, यासाठी दोन युवक व एक युवती अशा तीन महाविद्यालयीन स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदार केंद्रावर पाळणाघर सेविका / मदतनीस तसेच प्रथमोपचार केंद्रासाठी आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी खास व्यवस्था केली असून त्यासाठी 88 वाहनांची सोय केली आहे. दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका, अल्पदृष्टी मतदारांसाठी भिंगाची व्यवस्था केली आहे. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी 62 एस टी बसेस व 5 मिनीबस, 117 खाजगी वाहने तसेच कंदाटी खोऱ्यातील दुर्गम भागातील मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी तीन बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी आदेशलागू केला आहे. आणि मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसेल तर आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, पोस्टाचे किंव्हा बॅंकेचे छायाचित्र असेलेला पुरावा ग्राह्य धरला जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)