चिंतन : गोष्ट “राघूचा वड’ कथेची 

डॉ. दिलीप गरूड 

“मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत हे मराठी मुलखात सर्वदूर परिचित होते. त्यांची कर्णाच्या जीवनावरील “मृत्युंजय’ कादंबरी घराघरात पोहोचली. नव्हे, तिची पारायणे झाली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील “छावा’ ही चरित्रात्मक कादंबरी आणि श्रीकृष्णाच्या जीवनावरील “युगंधर’ ही कादंबरीही मराठी माणसांच्या मनात घर करून राहिली आहे. इतरही बरेच लेखन शिवाजीरावांनी केले आहे. 

ही वर्षांपूर्वी त्यांची “राघूचा वड’ ही कथा अमराठी मुलांच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली होती. पुण्याच्या बालभारती या संस्थेने त्या पुस्तकाची निर्मिती केली होती. अशीच काही वर्षे गेली. नंतर ते पुस्तक अभ्यासक्रमातून स्थगित करण्यात आले. पुन्हा नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकदा शिवाजीराव सावंतांना ती “राघूचा वड’ ही कथा हवी होती. त्यांनी ती कथा असलेले बालभारतीचे ते पुस्तक मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अगोदर एस. एस. सी. बोर्डात चौकशी केली. तेथे ते पुस्तक उपलब्ध होऊ शकले नाही. नंतर त्यांनी पुण्याच्या कुमठेकर रोडवरील शिक्षणशास्त्र संस्थेत चौकशी केली. तेथील पुस्तक ग्रंथालयातही ते पुस्तक उपलब्ध होऊ शकले नाही. मग शिवाजीरावांना कुणीतरी सांगितले, “”अहो, इकडे तिकडे कशाला चौकशी करता? थेट बालभारतीतच फोन लावा. तेथे ते पुस्तक मिळू शकेल. तेथे प्रा. माधव राजगुरू हे मराठी भाषा विशेषाधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांनाच फोन लावून विचारा. नक्की पुस्तक मिळेल.”

ही 1995 सालची गोष्ट आहे. तेव्हा भ्रमणध्वनी वापरात आले नव्हते. घराघरात आणि कार्यालयात लॅंडलाईन फोनच वापरले जात. मग एकेदिवशी शिवाजीराव सावंतांनी मराठी भाषा विशेषाधिकारी प्रा. माधव राजगुरू यांना फोन लावला. तर कार्यालयातून उत्तर मिळाले, “”ते कामानिमित्त बाहेर गेलेत. नंतर फोन करा.” मग शिवाजीरावांनी पुन्हा चार-पाच दिवसांनी फोन केला. तर कार्यालयातून उत्तर मिळाले, “”आत्ताच ते मिटिंगला गेलेत. कधी येतील ते सांगता येत नाही.” अशा या उत्तरांमुळे शिवाजीराव वैतागले. एवढ्या ख्यातकीर्त माणसाची ही तऱ्हा, तर मग सामान्य माणसाचे काय हाल होत असतील? असेच काही दिवस गेले आणि शिवाजीरावांनी पुन्हा भाषा विशेषाधिकाऱ्यांच्या कार्यालयात फोन लावला. तर उत्तर मिळाले, “”ते दौऱ्यावर गेलेत. आठवड्याने फोन करा.”

हा फोन करण्याचा कार्यक्रम अधूनमधून होतच होता. अखेर दोन महिन्यांनी प्रा. माधव राजगुरू जागेवर सापडले. मग मात्र शिवाजीराव रोखठोकपणे म्हणाले, “”अहो माधवराव, गेली दोन महिने मी तुम्हाला फोन लावतोय; पण तुम्ही जागेवर सापडत नाही. अहो, महाभारतातील पात्रे शोधायला आणि त्याच्यावर संशोधन करायलाही मला एवढा वेळ लागला नव्हता.”

मग आवाजाची पट्टी बदलत शिवाजीराव म्हणाले, “”पूर्वी अमराठी मुलांसाठी तुमच्या बालभारतीने पुस्तके काढली होती. त्यातील नववीच्या पुस्तकात माझी “राघूचा वड’ ही कथा घेतली होती. मला ते पुस्तक किंवा त्या पुस्तकातील माझी कथा हवी आहे. लवकरात लवकर मिळाली तर बरे होईल.” त्यावर माधव राजगुरू म्हणाले, “”सर, मी दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्यासारख्या महान लेखकाला इथे पुन्हा पुन्हा फोन करावा लागला. कार्यालयाच्या कामात व्यस्त असल्यामुळे मी आपला फोन घेऊ शकलो नाही, पण लवकरात लवकर मी ते पुस्तक मिळवीन आणि तुमची कथा घरी आणून देईन. आता पुन्हा तुम्हाला फोन करावा लागणार नाही.” त्यानंतर माधव राजगुरू यांनी पूर्वी प्रकाशित केलेली पुस्तके शोधून काढली. त्यातील नववीचे मराठीचे पाठ्यपुस्तक मिळवले. त्यातील “राघूचा वड’ या कथेची झेरॉक्‍स काढली.

शिवाजीराव सावंत यांचा पत्ता मिळविला आणि त्यांची कथा त्यांना विनम्रपणे नेऊन दिली. तेव्हा शिवाजीराव गडबडीत होते. त्यांनी माधव राजगुरूंना धन्यवाद दिले. ते मनात म्हणाले असतील, “”सरकारी फायलींच्या ढिगाऱ्यात आणि मिटिंग, दौरे यात गुरफटलेले असतानाही या नेक अधिकाऱ्याने जुने गठ्ठे उघडून, त्यातून पुस्तक शोधून, माझ्या कथेची झेरॉक्‍स काढून, ती कथा मला घरपोच केली. असे संवेदनशील, जाणते अधिकारी असतील तर जनतेची कामे कशाला रखडतील? आज आपल्या देशाला अशाच निष्ठावान आणि निःस्पृह अधिकाऱ्यांची गरज आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)