चिंतन : अचूक मार्गदर्शन 

डॉ. दिलीप गरूड 

1972 साली मी मॅट्रिक परीक्षा पास झालो. पुढे मी इंटर सायन्सला शिकत असताना काही मुले म्हणू लागली-
“”बी.एस्सी होऊन काही उपयोग नाही. नोकऱ्या लागत नाहीत. त्यापेक्षा डिप्लोमा केलेला बरा. डिप्लोमा केल्यावर नोकरीची हमखास संधी आहे.”

या चर्चा ऐकून मी गोंधळून गेलो. आम्हा भावंडात मीच फक्त मॅट्रिक पास होऊन पुण्यात शिकायला आलो होतो. घरी शेतीचे तुटपुंजे उत्पन्न होते, आणि खाणारी तोंडे जास्त होती. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर मला नोकरी मिळणे आवश्‍यक होते. नव्हे, ती माझी गरजच होती.

म्हणून मी पुणे विद्यापीठ रोडवरील गव्हर्न्मेंट डिप्लोमा कॉलेजमध्ये प्रवेशासंबंधी चौकशी केली. माझे मॅट्रिकचे परीक्षेचे गुण उत्तम होते. त्या गुणांवर मला निश्‍चित प्रवेश मिळणार होता. मात्र शास्त्र शाखेत शिकलेल्या दोन वर्षांवर पाणी सोडावे लागणार होते. हे माहीत असूनही मी प्रवेशासाठी अर्ज केला. हा निर्णय माझा मीच घेतला. घरी कल्पना दिली नाही. घरचेही शिक्षणातील संधीबद्दल अनभिज्ञ होते.

पुढे जून महिना सुरू झाला. डिप्लोमाच्या प्रवेशासंबंधी कॉलेजकडून काही उत्तर आले नाही. म्हणून मी शास्त्र शाखेच्या तिसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. आमचे कॉलेज सुरू झाले आणि तिकडे गावी बेलसरला गव्हर्न्मेंट कॉलेजचे पत्र गेले. ते पत्र इंग्रजीत होते. माझ्या डिप्लोमा कोर्सच्या प्रवेशासंबंधी ते पत्र होते. वडिलांना ते पत्र वाचता येईना. म्हणून त्यांनी ते पत्र हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना दाखवले. ज्या हायस्कूलमध्ये मी शिकलो होतो, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना म्हणजे पाटोळे सरांना ते पत्र दाखवले. ते पत्र वाचून ते अचंबित झाले. इतर शिक्षकांनाही ते पत्र दाखवले. मग त्यांच्यात चर्चा सुरू झाली. नंतर सर्वजण या निर्णयावर आले की, आहे तोच बी.एस्सीचा कोर्स पुरा करणे योग्य ठरेल. नंतर मुख्याध्यापकांनी माझ्या वडिलांना सांगितले की, “”दिलीपला म्हणावे आहे हाच कोर्स पुरा कर. धरसोड करू नको. बी.एस्सी. नंतरही नोकऱ्या मिळतात. आताचा बीएस्सीचा कोर्स सोडून डिप्लोमाला प्रवेश घेतला तर गेलेली दोन वर्षं वाया जातील. हे पत्र घेऊन तुम्ही उद्या पुण्याला जा. माझा निरोप सांगा.”

ही 1974 सालची गोष्ट आहे. तेव्हा खेड्यात लॅंड लाईन फोनही पोहोचले नव्हते, मग भ्रमणध्वनीचा तर प्रश्‍नच नाही. त्यामुळे संपर्काची साधने दुर्मिळ होती. दुसऱ्या दिवशी वडील मला भेटायला पुण्याला आले. सोबत त्यांनी ते पत्र आणले होते. स्वारगेटला उतरून ते मी रहात असलेल्या “मराठा वसतिगृहात’ आले. त्यांनी ते पत्र मला दाखवले. ते डिप्लोमा कोर्सच्या प्रवेशासंबंधीचं पत्र होते. त्यात प्रवेश किती तारखेपर्यंत घ्यायचा, फी किती भरायची याचा उल्लेख होता. पत्र वाचून होताच वडील मला म्हणाले,

“”हे पत्र मी पाटोळे सरांना दाखवले. सर्व शिक्षकांनी ते वाचले. त्या सर्वांचे असे मत पडले की, आहे हा कोर्स चांगला आहे. बी.एस्सी झाल्यानंतरही अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळतात. हा नवीन कोर्स घेतला तर पहिल्या दोन वर्षांच्या शिक्षणावर पाणी सोडावे लागेल. म्हणून आहे हाच कोर्स पूर्ण कर.”

वडिलांचे म्हणणे मी मान्य केले. खरं म्हणजे ते म्हणणे मला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे होते. ते त्यांच्या अनुभवाचे बोल होते. माझ्यापेक्षा या क्षेत्रातले त्यांना जास्त कळत होते. माझ्या शिक्षकांचे म्हणणे ऐकल्यावर माझ्याही मनातला गोंधळ थांबला. द्विधा मनःस्थिती संपली. मी मनाने स्थिर झालो. आणि शांतपणे पुढच्या अभ्यासाला लागलो.

यथावकाश मी बी.एस्सी झालो. आणि तीनच महिन्यांनी मला शिक्षकाची नोकरी लागली. आंबेगाव तालुक्‍यातील पेठ या गावी मी शिक्षक म्हणून रुजू झालो. तेथील वाकेश्‍वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मी गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले.
दोन वर्षे अध्यापन करून मी पुण्याला बी.एड.चा कोर्स करण्यासाठी आलो. बी.एड. झाल्यावर पुणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये 35 वर्षे अध्यापन केले. हे अध्यापन करता करता

बहिःस्थ विद्यार्थी म्हणून एम.ए., एम.एड. आणि पीएच.डी. केले. वीस पुस्तकांचे लेखन केले. मुलांना गोष्टी सांगितल्या. शिक्षकांना कथाकथनाचे तंत्र सांगितले. त्यांच्या कार्यशाळा संबंध महाराष्ट्रभर घेतल्या. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. आता मी सेवानिवृत्तीचा आनंद घेत आहे. मात्र, त्यावेळी माझ्या शिक्षकांचा सल्ला ऐकला नसता तर आज मी कुठे असतो? माझ्या शिक्षकांनी मला अचूक वेळी योग्य मार्गदर्शन केले, हे त्यांचे माझ्यावर मोठे उपकारच होत. त्या सर्व शिक्षकांचा मी ऋणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)