चिंतन : माझा अनमोल ठेवा

डॉ. दिलीप गरुड
ही 1993 सालची गोष्ट आहे. मी मुलांसाठी “वक्तृत्व कलेची साधना’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले होते. या 96 पानी पुस्तकाच्या पूर्वार्धात वक्तृत्वासंबंधी विवेचन केले आहे; तर उत्तरार्धात तीन आदर्श भाषणांचे नमुने घेतले आहेत.

पुस्तक तयार झाले. फक्त कव्हर छपाई करून बाईंडिंग करण्याचे काम राहिले. पुस्तकाचे काम सुरू असताना एक जाणकार गृहस्थ आमचे प्रकाशक पुराणिकांना भेटले. गप्पांच्या ओघात पुराणिकांनी त्यांना पुस्तक काढत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर आतील छापलेला मजकूरही दाखवला. त्या गृहस्थांनी पुस्तक चाळले. नंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. “”पुस्तक चांगले आहे; पण ज्यांची भाषणे आदर्श म्हणून या पुस्तकात घेतलीत, त्यांची लेखी परवानगी घेतली आहे काय?”

त्यावर पुराणिक म्हणाले, “”लेखकाने घेतली असेल. ते इथे आल्यावर मी त्यांना विचारतो.”
चर्चा करून ते गृहस्थ निघून गेले आणि पुराणिकांचा मला फोन आला. “”अहो गरूड, तुम्ही पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे यांची भाषणं पुस्तकात घेतलीत; पण त्यांची लेखी परवानगी घेतलीत काय?” “”नाही.” “”मग ताबडतोब मला भेटायला या.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी पुराणिकांना भेटायला गेलो. त्यांनी सर्व प्रकार कथन केला आणि मला म्हणाले, “”जर या लेखकांच्या लेखी मान्यता नसतील तर उद्या ते आपणाला कोर्टात खेचू शकतात. त्यांना न विचारता त्यांचा मजकूर आपण छापू शकत नाही.”
त्यावर मी म्हणालो, “”पण ही भाषणे कोणाची आहेत, कोणासंबंधी आहेत याचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे.” “”उल्लेख असला तरी त्यांची लेखी परवानगी हवी. नाहीतर प्रकरण अंगाशी येईल.”

कोर्टाचं नाव काढल्यावर मी घाबरून गेलो. मी नवोदित लेखक होतो. या क्षेत्रातील माहिती मला फारशी नव्हती. पुस्तक तर शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपले होते. मी माझे गुरू डॉ. न. म. जोशी यांना फोन लावला. सारी वस्तुस्थिती कथन केली. त्यावर ते म्हणाले, “”हे बघ, घाबरू नकोस. पुस्तकाची आतील पाने छापून झालीत हे कोणाला सांगू नकोस. पुस्तक छापायचंय आणि त्यात तुमचं भाषण घ्यायचंय, मला परवानगी द्या, अशी विचारणा कर. नाही दिली तर मग मी आहेच. न.मं.च्या बोलण्याने मला धीर आला. मग मी आणि पुराणिकांनी फोनच्या डिरेक्‍टरीमधून पु. ल. देशपांडे यांचा नंबर हुडकून काढला.

भीत भीत त्यांना फोन लावला. फोनची रिंग वाजली. स्वतः पु. ल. फोनवर आले. मी तणावात असतानाही म्हणालो, “”मी दिलीप गरूड बोलतोय. मी एका शाळेत शिक्षक आहे. मुलांसाठी वक्तृत्वावर मी पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात तुमच्या एका भाषणाचा समावेश करायचाय. त्यासाठी तुम्हाला भेटायचंय.”
“”कुठलं भाषण तुम्हाला घ्यायचंय?” “”बॅ. नाथ पै यांच्या द्वितीय स्मृतिदिनी केलेलं भाषण. साधना प्रकाशनाने ते छापलंय. “प्रकाशनाचा पुत्र’ या नावाने.” पलीकडून पुन्हा प्रश्‍न, “”नाव काय म्हणालात तुमचं?” “”दिलीप गरूड.” “”हे बघा, मला भेटायला वगैरे येऊ नका. माझी तब्येत बरी नाही. गुडघे दुखताहेत. तुम्ही ते भाषण घ्या; पण पूर्ण घेऊ नका.”

“”ठीक आहे. मी तुम्हाला तसं पत्र पाठवतो.”
“”पाठवा.”

आमचे संभाषण संपले. माझ्या मनावरचा प्रचंड ताण कमी झाला. शिवाय पु. लं. सारखे दिग्गज लेखक आपल्याशी बोलले याचा आनंद झाला. ही गोष्ट मी नमंच्या कानावर घातली. त्यांनीही आनंद व्यक्त केला आणि पुढील सल्ला दिला.

“”आजच्या आज पुलंना लेखी पत्र पाठव. त्याचप्रमाणे आचार्य अत्रे यांच्या मुलीला शिरीष पै यांनाही पत्र पाठव. त्या मुंबईला असतात. डिरेक्‍टरीतून पत्ता मिळव. वासू देशपांडे पुण्यात असतात. त्यांनाही समक्ष भेटून लेखी संमती घे.” मी होकार दिला आणि त्याच दिवशी पु. ल. देशपांडे यांना पत्र पाठवले. आचार्य अत्रे यांचे अनंत काणेकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त झालेले भाषण मी घेतले होते. म्हणून शिरीष पै यांनाही पत्र पाठवले. वासू देशपांडे यांच्या बॅ. नाथ पै यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकातून मी नाथ पै यांचे 1969 साली फैजपूर येथे केलेले भाषण घेतले होते. म्हणून लेखक वासू देशपांडे यांनाही पत्र पाठवले. यथावकाश तीनही मान्यवरांच्या लेखी परवानग्या मिळाल्या.

पुढे यथावकाश माझे पुस्तक प्रकाशित झाले. कुठेही कोर्टकचेरी, वादविवाद झाला नाही. मात्र, पु. ल. देशपांडे, शिरीष पै यांच्यासारख्या थोर लेखकांनी उत्तरादाखल पाठविलेली पत्रे माझ्या संग्रही आहेत. माझ्या आयुष्यातील हा फार मोठा ठेवा आहे असे मला वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)