जखमांकडे दुर्लक्ष नकोच (भाग 2)

-डाॅ.प्रदीप गाडगे

काही व्याधी अशा आहेत की, अद्याप त्यावर जगात उपाय वा औषध सापडलेले नाही. दिवसेंदिवस ऑक्‍टोपसप्रमाणे हातपाय पसरत असलेला मधुमेह हा त्यापैकीच एक होय. मधुमेह ही व्याधी भारतात तर इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की, भारत ही मधुमेहाची राजधानीच मानली जाते.

मधुमेहामुळे कराव्या लागणाऱ्या ऍम्प्युटेशनसाठी डायबेटिक फूट अल्सर हे सर्वाधिक आढळणारे कारण असते. मधुमेहींना डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे (मज्जातंतू निकामी होणे) जखमांची आणि पायाला झालेल्या अल्सरची जाणीव होत नाही. हे अल्सर काही वेळा बरे होत नाहीत. परिणामी, गंभीर स्वरूपाचा संसर्ग होतो. अनियंत्रित मधुमेहामुळे मज्जातंतूंची कार्यक्षमता कमी होते आणि संवेदनाही कमी होते. ज्या जखमांकडे (अगदी छोट्या स्वरूपाच्या) लक्षही जाणार नाही किंवा वेदनाही होणार नाही, अशा जखमांमुळेही अल्सर, संसर्ग होऊ शकतो. तसेच ऊती मृत (गॅंगरिन) होऊ शकतात.

-Ads-

तळपायाला फोड आल्यामुळे त्या व्यक्तीची चाल बदलू शकते. तुम्ही फोड आलेल्या भागाला जपण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तुमच्या चालीत फरक पडू शकतो. ज्यांना हे जाणवत नाही, ते असे करत नाहीत. ते अगदी सहजपणे त्या फोडावर चालतील, जणू काही तिथे फोड आलेलाच नाही. तो फोड फुटू शकतो, त्याला संसर्ग होऊ शकतो आणि त्याला फूट अल्सर होऊ शकतो. हा अल्सर थेट हाडांपर्यंत पोहोचू शकतो आणि संपूर्ण पायाला संसर्ग होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. परिणामी ऍम्प्युटेशन करावे लागू शकते.

एखादा अवयव कापावा लागणे, ही दुर्दैवी परिस्थिती असते आणि काही वेळा ऍम्प्युटेशन करावे लागणे अपरिहार्य असते. ऍम्प्युटेशनमुळे शरीराची ढबच बदलून जाते, त्याचप्रमाणे इतर अनेक हालचालींवर, विविध कृतींमध्ये सहभागी होण्यावर आणि राहणीमानाच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो. ऍम्प्युटेशनमुळे रुग्णाला नैराश्‍य, खिन्नता, सामाजिक अवघडलेपण आणि शरीराच्या रचनेविषयी औदासीन्य येऊ शकते.

ऍम्प्युटेशनमुळे जीवनशैली बदलावी लागते. उपजीविकेच्या स्रेतावर थोडाफार किंवा गंभीर परिणाम होतो. दुस-या शब्दांत सांगायचे झाले, तर ऍम्प्युटेशनचा त्या व्यक्तीवर मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतो. रुग्णाचे वय, लिंग आणि शिक्षण लक्षात घेत त्या रुग्णाला मानसिकदृष्टय़ा तडजोड करण्यास तयार करण्यासाठी अनेक घटक शोधून काढण्यात आले आहेत.

ऍम्प्युटेशननंतरही मधुमेहावरील उपचार सुरू ठेवावे लागतात. ज्या व्यक्तींचे एक ऍम्प्युटेशन झाले आहे, त्यांना दुसरे ऍम्प्युटेशन करावे लागण्याचा धोका असतो. सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवणे आणि तंबाखूसेवन टाळणे यामुळे मधुमेहाशी संबंधित अतिरिक्त गुंतागुंतीला सामोरे जावे लागणार नाही.

वाढती संख्या…

गेल्या दशकापासून भारतातील मधुमेहींच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. भारतात सुमारे 65.1 दशलक्ष मधुमेही आहेत. इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशनने केलेल्या पाहणीनुसार 2010 साली 50.8 दशलक्ष मधुमेही होते. रक्तशर्करेवरील नियंत्रणाचा अभाव, रक्तदाब आणि ब्लड लिपिड्‌स यामुळे अंतर्कर्णातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी बहिरेपणा येतो.

वेळी-अवेळी जेवण, अपायकारक जीवनशैली, शारीरिक हालाचालींचा अभाव, अतिरिक्त आहार आणि जीवनशैलीबाबत घेतलेल्या अनेक उत्स्फूर्त निर्णयांमुळे मधुमेहींच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. जीवनशैलीतील अशा बदलांमुळे इन्सुलिनला विरोध निर्माण होतो आणि शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही. मी उपचार करत असलेल्या मधुमेहींपैकी 13 ते 15% मधुमेहींना बहिरेपणा आला आहे. विशेषत: ज्यांचे वय 45 हून अधिक आहे आणि रक्तशर्करेची पातळी नियंत्रित आहे, अशांमध्ये ही शक्‍यता अधिक असते.

लक्षणे

याची सुरुवात कानाला कंड येण्यापासून होते आणि त्या व्यक्तीला कानात असाधारण आवाज ऐकू येऊ लागतो आणि हळुहळू ऐकू येणे पूर्ण बंद होते. मधुमेहींमध्ये सूक्ष्म वाहिन्यांना होणा-या रक्तपुरवठ्यावर परिणाम झालेला असतो. परिणामी, अंतर्कर्णामध्ये वेगाने झीज होते. यामुळे एका कानामध्ये लघु किंवा उच्च फ्रिक्वेन्सी होते. एखाद्या कानामध्ये प्रतिध्वनी ऐकू येत असेल तर मधुमेहीसाठी हे बहिरेपणा येण्याचे लक्षण असते.

उपाय

बहिरेपणा आल्यानंतर श्रवणयंत्र वापरणे हा एकच उपाय असतो. कानाची नियमित तपासणी करावी आणि दर दोन-तीन वर्षानी ऑडिओग्राम काढून घ्यावा हे हितावह आहे. बहिरेपणा हा व्यक्तीनुरूप बदलू शकतो. मधुमेह नसलेल्या व्यक्तींनाही बहिरेपणा येऊ शकतो, पण मधुमेहींमध्ये बहिरेपणा येण्याची शक्‍यता अधिक असते.

जखमांकडे दुर्लक्ष नकोच (भाग 1)    जखमांकडे दुर्लक्ष नकोच (भाग 3)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)