जखमांकडे दुर्लक्ष नकोच (भाग 1)

-डाॅ.प्रदीप गाडगे

काही व्याधी अशा आहेत की, अद्याप त्यावर जगात उपाय वा औषध सापडलेले नाही. दिवसेंदिवस ऑक्‍टोपसप्रमाणे हातपाय पसरत असलेला मधुमेह हा त्यापैकीच एक होय. मधुमेह ही व्याधी भारतात तर इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की, भारत ही मधुमेहाची राजधानीच मानली जाते.

जगातील लक्षावधी लोक कुठल्या ना कुठल्या तरी विकाराने आजारी असतात. ज्यांना कसलाच आजार नसतो आणि जे निरोगी आयुष्य जगतात ते भाग्यवान म्हणायला हवेत. भारतासारख्या असंख्य गरीब व अशिक्षित लोक असलेल्या देशात साथीचे व अन्य विविध प्रकारचे आजार असले व ते वाढत असले तर नवल नाही. या आजारांबाबत जनजागृती करण्याचे तसेच या आजारावर उपचार करण्याची व्यवस्था असणारे दवाखाने, आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये यांचे जाळे सरकारने उभे केले आहे.

अर्थात, या सर्व सोयीसुविधा परिपूर्ण आहेत, असे नाही. त्यातील उणिवा दूर करण्याचा व आरोग्यसेवा परिपूर्ण आणि व्यापक करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. परंतु काही व्याधी अशा आहेत की, अद्याप त्यावर जगात उपाय वा औषध सापडलेले नाही. दिवसेंदिवस ऑक्‍टोपसप्रमाणे हातपाय पसरत असलेला मधुमेह हा त्यापैकीच एक होय. मधुमेह ही व्याधी भारतात तर इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की, भारत ही मधुमेहाची राजधानीच मानली जाते. आज भारतात सहा कोटी 30 लाख मधुमेहग्रस्त लोक आहेत आणि 2030 पर्यंत ही संख्या दहा कोटींवर गेलेली असेल, असा अंदाज आहे.

देशातील दर पाचवी व्यक्ती ही मधुमेही असते. म्हणजे मधुमेहग्रस्त लोकांचे प्रमाण किती चिंताजनक आहे, हे लक्षात यावे. अनेक आजारांना निमंत्रण देणाऱ्या या व्याधीवर औषधांद्वारे नियंत्रण ठेवता येते. पण ती पूर्णपणे बरी करणारे किंवा तिचे उच्चाटन करणारे औषध आजमितीस जगात उपलब्ध नाही. अनियमित व चुकीचा आहार, बदललेली जीवनशैली, सततचे बैठे काम, व्यायामाचा अभाव, वाढता ताणतणाव यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे.

हे प्रमाण काबूत ठेवण्यासाठी, वेळोवेळी रक्ततपासणी करण्यासाठी आणि नियमित औषधोपचारासाठी व्यापक प्रमाणावर सार्वजनिक व्यवस्था असण्याची गरज आहे. मुंबईसारख्या महानगरात आज मधुमेहींची संख्या फार मोठी आहे व ती दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहाची नियमित तपासणी व त्यावरील औषधोपचार यांचा खर्च खूप आहे व तो सतत करावा लागतो. हा खर्च सर्व नागरिकांना सर्व काळ परवडणारा नाही.

ऍम्प्युटेशन म्हणजे अपघात वा वैद्यकीय परिस्थिती किंवा शस्त्रक्रियेने अवयव कापणे. मॅलिग्नन्सी किंवा गॅंगरिन उद्भवलेल्या अवयवाला होणा-या वेदना किंवा आजाराची वाढत जाण्याची क्रिया नियंत्रणात आणण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. 80% ट्रॉमॅटिक ऍम्प्युटेशनसाठी मधुमेह कारणीभूत असतो. हा आजार होण्याला अथेरोस्क्‍लेरॉसिस किंवा दीर्घकाळापासून असलेला अर्ट्रीअल ऑक्‍लुसिव्ह डिसीज (व्यायाम करताना किंवा आराम करताना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्या निमुळत्या होणे) हे त्याचे मूळ कारण असते. बहुतेक ऍम्प्युटेशन्स पायासारख्या टोकाकडील अवयवांची होतात.

मधुमेह असलेल्या 60 ते 70 टक्के रुग्णांमध्ये डायबेटिक न्यूरोपथी विकसित होते. वाढलेले वय, प्रमाणाबाहेर वाढलेले वजन आणि ज्यांना 25 वर्षाहून अधिक काळ मधुमेह आहे त्यांना न्यूरोपथीचा आणि ऍम्प्युटेशनचा धोका अधिक असतो. मधुमेह नियंत्रणात हलगर्जीपणा, असाधारण कोलेस्टेरॉल पातळी आणि उच्च रक्तदाब यामुळे सुद्धा हा धोका वाढतो. धुम्रपानामुळे ही जोखीम कैक पटींनी वाढते.

जखमांकडे दुर्लक्ष नकोच (भाग 2)   जखमांकडे दुर्लक्ष नकोच (भाग 3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)