पाणीबाणी : शेतात पाईपलाईन करण्यासाठी “त्यांनी’ चोरला पाईपांनी भरलेला टेम्पो
रातोरात टेम्पो उस्मानाबादला
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. चाकण पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना खबऱ्यामार्फत संशयितांची नावे मिळाली. त्यावेळी पोलिसांनी येरवडा येथील गणेशनगर येथील बिडी कामगार वसाहत येथे सापळा लावला.
पिंपरी – गावाकडे पडलेला भीषण दुष्काळ.., त्यामुळे बिघडलेली आर्थिक गणिते.. ही कारणे दुष्काळग्रस्त भागातील तरुणांना आता टोकाचे पाऊल टाकायला भाग पाडत आहे, ही गंभीर बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गावाकडे दुष्काळ पडल्याने आता आपल्या कोरडवाहू शेतीत काही तरी करायला हवे, या विचाराने “पेटून उठलेल्या’ तरुणांनी शेतात पाईप लाईन करण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला. मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या व सध्या येरवडा व खेड तालुक्यात वास्तव्यास असलेल्या तीन तरुणांनी चक्क पाईपांनी भरलेला टेम्पो चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरी करणाऱ्या तिघांनाही पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे.
अमोल विक्रम मोरे (वय 20), समाधान त्रिंबक दौंड (वय 23, दोघेही रा. बिडी कामगार वसाहत, गणेशनगर, येरवडा) व संदीप राजेंद्र मोरे (वय 25 रा. शिक्रापूर रोड, शेलपिंपळगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपी संदीप मोरे हा सध्या मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहे. गावाकडील दुष्काळी परिस्थितीमुळे तो सध्या चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथे वास्तव्यास आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक गणिते बिघडली आहेत. संदीप मोरे याच्या गावाकडील शेतातही दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतात पाईपलाईन करुन बागायत करायचा विचार करीत होता. मात्र शेतासाठी अधिकचे पैसे त्याच्याकडे नव्हते.
अमोल मोरे व समाधन दौंड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांचा तिसरा साथीदार संदीप मोरे याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी संदीपला शेलपिंपळगाव येथून ताब्यात घेवून अटक केली. या तिघांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी पळवलेला टेम्पो आरोपींनी रातोरात उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा व वाशी गावाच्या हद्दीमध्ये नेवून तेथे लपवून ठेवला असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा व वाशी तालुक्यातील दळवेवाडी येथे जावून गुन्ह्यातील टेम्पो व 900 फिनोलेक्स कंपनीचे पाइप असा 11 लाख 29 हजार 512 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
…असा शिजला “प्लॅन’
संदीप याला 6 जून रोजी रात्री शिक्रापूर रोडवर एक पाईपाने भरलेला टेम्पो भरलेला दिसला. त्याने टेम्पोची छायाचित्र काढून येरवडा येथील अमोल आणि समाधान या मित्रांना पाठवले. गावाकडील शेतात पाईपलाईन करण्यासाठी हे पाईपाने भरलेला टेम्पो चोरण्याचा “प्लॅन’ सांगितला. त्यानुसार अमोल मोरे व समाधान दौंड यांनीही होकार देत टेम्पोच चोरण्याचा “प्लॅन’ आखला. तिघांनी रात्री शिक्रापूर रोडवरुन जाणाऱ्या टेम्पोला दुचाकी आडवी लावली. टेम्पो थांबल्यानंतर तिघांनी आम्ही “फायनान्स’ कंपनीचे लोक असून, तुमच्या टेम्पोचा हप्ता थकलेला आहे, असे सांगून हा टेम्पो पळविला.