त्यांना तुमच्या भलाईपेक्षा मलई हवी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

File photo

अरुणाचल भाजपासाठी सौभाग्य आणणारा प्रदेश

इटानगर – कॉंग्रेसचे दिल्लीत सरकार असो किंवा एखाद्या राज्यात.. त्यांची भ्रष्टाचाराशी कायम आघाडी राहिली आहे. कॉंग्रेसला केवळ मलई कशी मिळेल याचीच चिंता असते आणि आम्हाला देशाच्या भल्याची चिंता असते, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

अरुणाचल प्रदेशमधील एक प्रचारसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, अरुणाचल प्रदेश भाजपासाठी सौभाग्य आणणारा प्रदेश आहे. उत्तर पूर्वमध्ये कमळ फुलण्याची सुरुवात इथूनच झाली होती. मला आशा आहे की, 2019 मध्येही तुम्ही अरुणाचलमध्ये पेमा खांडू आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणण्यासाठी मदत कराल.

कॉंग्रेसची नेहमीच भ्रष्टाचाराबरोबर आघाडी राहिली आहे. हा सर्वांना बांधून ठेवणारा “फेव्हिकॉल करप्शन’ आहे. त्यांचे नेते गरिबांची थाळी चोरतात. त्यांचे दिल्लीत बसलेले नेते आयकर चोरतात. वृत्तपत्र चालवण्यासाठी दिलेल्या जमिनीतून लाखो रुपयांचे भाडे कमवतात. संरक्षण व्यवहारात दलाली घेतात. स्वत: जामिनावर आहेत. जे जामिनावर आहेत, ते चौकीदारला शिव्या देत आहेत.

ना हे देशाच्या जवानाची चिंता करतात ना युवकांची. भारत जेव्हा-केव्हा मोठे यश मिळवतो तेव्हा नामदार आणि त्यांच्या दरबारी लोकांचे चेहरे पडतात. फक्त अश्रू ढाळणेच शिल्लक राहिलेले असते. सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे. जेव्हा भारताने दहशतवाद्यांच्या घरात घुसून मारले तेव्हा त्यांची वर्तणूक काय होती, जेव्हा आमचे वैज्ञानिक जगाला आश्‍चर्यचकीत करतात. तेव्हा हे त्याची खिल्ली उडवतात. ज्यावर आपल्याला अभिमान वाटतो. त्याचे त्यांना दु:ख होते, अशी टिकेची झोड उडविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)