प्यायला नाही पाणी अन्‌ शासन म्हणतेय मका पेरा !

File Photo

संगमनेर: संगमनेर तालुका दुष्काळात होरपळत असताना, शासन मका पेरा म्हणत आहे. ज्या तालुक्‍यात खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेले. जिथे वर्षभरात अत्यल्प पाऊस पडल्याने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्या तालुक्‍यात तब्बल 26 टन मका बियाणे, जनावरांसाठी चारा करा, असे म्हणत वाटप करून शासनाने एकप्रकारे दुष्काळग्रस्तांची कुचेष्टाच केली आहे.

खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीही यंदा पाऊस पडला नाही. काही भागात विहीर, नदीच्या पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी थोडीफार पेरणी केली, ती सुद्धा वाया गेली. काही ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव झाला व जे पेरले ते पावसाभावी उगवले ही नाही. तीव्र दुष्काळाने माणसाचे जगणे कठीण केलेले असताना जनावरांचे तर माणसांपेक्षा जास्त हाल सुरू आहेत. दोन्ही हंगाम वाया गेल्याने येथे चारा उपलब्ध नाही. जनावरांच्या पाण्यासाठी शासनाकडे सध्या कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा निर्माण करावा त्यासाठी शासनाने केवळ मका, ज्वारी बियाणे वाटप करून शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचा आव आणला आहे. त्यामुळे संतापही व्यक्‍त होत आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करायचा आहे. 7/12 उतारा, आधार कार्ड, किती जमीन आहे, त्यापैकी किती जमिनीत बियाणे पेरणार पण पुढचे 3 ते 4 महिने शेतकऱ्याने मका पिकाला पाणी कुठून घालायचे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सप्टेंबर ते ऑक्‍टोबर हा रब्बी हंगामातील पेरणीचा कालावधी असतो. पाऊस नसल्याने यंदा पेरणी झाली नाही. पण मका, ज्वारी पेरा म्हणणारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे.

चारा डेपो आणि चारा छावण्यांत भ्रष्टाचार झाल्याच्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी तक्रारी झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यावेळी जनावरे जगली आणि छावणी मालकही जगले. आता तालुक्‍यात 2012 पशु गणनानुसार लहान जनावरे 35 हजार 115, मोठी जनावरे 1 लाख 57 हजार 87 मेंढ्या आणि शेळ्या 1 लाख 62 हजार 528 एवढ्या आहेत. एकूण पशुधन 3 लाख 54 हजार 730 असून या पशुधनास महिन्याला 31 हजार 427 मे. टन ओली वैरण आणि सुका वाळलेल्या चाऱ्याची आवश्‍यकता आहे. दररोज 83 लाख 13 हजार 235 लिटर पाणी जनावरांसाठी पिण्यासाठी आवश्‍यक आहे. शासनाने त्याची सोय करण्याची गरज आहे.

2012 पासून आजतगायत जनावरांची वाढ झाली परंतु अजूनही शासनास ह्या विभागाची 7 वर्षानंतरही पशुगणना करण्यास वेळ मिळाला नाही फक्‍त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन माणसाची गणना करुण लाखो रुपये जाहिरातीवर खर्च करीत आहे, परंतु जनावराचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून शेतकऱ्याला संकटास सामोरे जावे लागत आहे.


संगमनेर तालुक्‍यात प्रवरा आणि मुळा नदी कठाचा काही भाग सोडला तर प्यायला पाणी नाही. जनावरे चाऱ्यासाठी तडफडत आहेत. शेतकऱ्यांनी मका पेरली तर पिकाला पाणी कुठले द्यायचे, हे सरकारने सांगावे.
– संतोष रोहम, स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्ते

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)