वृक्षसंवर्धनासाठी उपाययोजना गरजेची

– संतोष वळसे पाटील

वृक्षसंवर्धन करण्यासाठी योग्य उपाययोजना होत नसल्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठीच वृक्षसंवर्धन करण्याची धडपड होते कि काय, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांचा खर्च वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी कागदोपत्री होत असला तरी प्रत्यक्ष मात्र, झाडांची संख्या वाढल्याचे दिसत नाही.

शतकोटी वृक्षलागवडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाजावाजा करुन वृक्ष लागवड करण्यात आली, परंतु मागील दोन ते तीन वर्षांचा विचार करता यातील किती वृक्ष जगले याबाबत काहीच कळत नाही. वृक्षलागवड करताना केलेला गाजावाजा मोठा झाला, परंतु संवर्धनाच्या बाबतीत ठोस काम झाले नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीला ठराविक झाडे लावण्याचे उद्दिष्ट शासनाच्या वतीने देण्यात आले. ग्रामपंचायतींनी हे उद्दिष्ट फक्त कागदावरच पूर्ण केले असून दरवर्षी तीन ते पाच हजार झाडे एका ग्रामपंचायतीने लावली. मात्र, मागील तीन वर्षांचा विचार करता दहा ते पंधरा हजार झाडांपैकी दहा ते पंधरा झाडेही काही जगवता आली नाहीत.

त्यामुळे वृक्षलागवड करुन शासनस्तरावर प्रयत्न केले जात असले तरी संवर्धनासाठी योग्य उपाययोजना नसल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया जात आहे. त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांचे काय झाले, वृक्षसंवर्धनासाठी आलेला पैसा गेला कुठे याबाबत शासनाने चौकशी करुन सदर अधिकारी, सरपंच आणि सदस्यांवर कारवाई करावी.जर प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर शासनस्तरावरुन कारवाई झाली तर येणाऱ्या कालखंडात लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन होईल. वृक्ष लागवड व संवर्धनासाठी कठोर कारवाई व जनजागृती करणे गरजेचे आहे. काही गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत एकाच खड्‌यात दर वर्षी वृक्ष लागवड केल्याचे चित्रही पहावयास मिळते. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून तोच खड्डा, तेच नागरिक त्या ठिकाणी वृक्ष लागवड करीत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here