भोसरी येथील घटना : अनोळखी दोघांविरोधात गुन्हा
पिंपरी – खोटे नव्हे, खरे पिस्तूल आहे, असे सांगत गोळीबार केल्याच्या खळबळजनक घटना भोसरी, लांडेवारी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रिणीला सोडायला जाणाऱ्या युवकाला दोघांनी पिस्तूल दाखवत भर रस्त्यात अडवले. यावेळी युवकाने दोघांना ढकलून देत पिस्तूल खोटे आहे असे म्हणताच, आरोपीनी त्यांच्या जवळील गावठी कट्ट्यातून तरुणाच्या बाजूला गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडताच तरुणाने हे पिस्तूल आरोपीकडून हिसकावून घेतल्याने तरुणाचे प्राण वाचले. ही घटना भोसरी येथील लांडेवाडी येथे गुरुवार दि. 18 जुलै रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अक्षय सुरेश कांबळे (वय-26, रा. बाजीराव नगर,वडगाव शेरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हा त्याच्या मैत्रीणीला सोडण्यासाठी भोसरी येथील लांडेवाडी परिसरात गुरुवारी रात्री जात होता. त्यावेळी, तो लांडेवाडी येथे आल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांजणांनी पिस्तूलचा धाक दाखवत त्याची गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबवल्यानंतर फिर्यादी अक्षय यांने हे पिस्तूल खोटे आहे, असे म्हणून आरोपीला ढकलून दिले. चिडलेल्या आरोपीनी गावठी कट्ट्यातून फिर्यादीच्या बाजूला फायर केले.
यावेळी, फिर्यादीने प्रसंगावधान राखत आरोपीच्या हातातील गावठी कट्टा हिसकावून घेतला. मात्र, गोळीबारचा आवाज झाल्याने परिसरातील नागरीक रस्त्यावर जमा झाल्याचे पाहताच आरोपींनी मोटारसायकलवरुन पळ काढला. पोलिसांनी अक्षयकडून एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतूस व एक वापरलेली पुंगळी जप्त केली आहे.