कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं

– सतेज औंधकर 

निवडणुका लागल्या की राजकारणी एकमेकांचे उट्टे काढायला मोकळे होतात. कोल्हापुरात देखील असेच काहीसे घडते आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना आता कोल्हापूरचे कॉंग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक आणि शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यात शीतयुद्ध सुरू झालेले आहे. निवडणूक लोकसभेची आणि विषय गोकुळचा त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये गोकुळमध्ये राजकारण शिगेला जाणार यात शंका नाही.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, राधानगरी, कागल आणि चंदगड हे विधानसभा मतदारसंघ येतात. या संपूर्ण मतदारसंघांचा विचार करता कागल आणि चंदगड हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत तर कोल्हापूर दक्षिण हा भाजपकडे आणि राधानगरी, कोल्हापूर उत्तर आणि करवीर हे तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेना युतीचे प्राबल्य जास्त आहे. विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार आहेत तर प्राध्यापक संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार घोषित झालेले आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता धनंजय महाडिक यांना यंदाची निवडणूक सोपी जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांचे काका कॉंग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आता धनंजय महाडिक यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

महादेवराव महाडिक सध्या गावोगावी जाऊन आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना भेटून धनंजयला मतदान करा, असे सांगत आहेत. काल स्वतः ते करवीर तालुक्‍यातील खुपिरे या गावात आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी ते म्हणाले कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्यास जिल्ह्यात महाडिक गटाचे राजकारण संपणार असल्याची भीती आहे. चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) सत्ताही जाईल, असेही भाकीत त्यांनी केले आहे. गोकुळच्या विशेष सभेत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पोलिसांचे कडे तोडून मुख्य सभामंडपात धडक दिली होती. त्याचाही राग महाडिक यांनी व्यक्त केला आहे. चंद्रदीप ज्या पद्धतीने सभेला नाचत आला तसाच त्याचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा महाडिक यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात आमदार नरके यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचारात जोरदार पुढाकार घेतल्यानेही महाडिक यांना संताप अनावर झाला आहे.

महादेवराव महाडिक यांनी केलेल्या टीकेला चंद्रदीप नरके यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. विषय लोकसभा निवडणुकीचा सुरू असताना गोकुळचा विषय येतो कुठून असं म्हणत अप्पांचा तोल सुटला असल्याचे वक्तव्य आमदार चंद्रदीप नरके यांनी केले आहे. पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विरोधकांचा तोल सुटत आहे. आप्पांना आपण सांगायला हवं, की ही खासदारकीची निवडणूक आहे. आमदारकीची नाही. आमदारकी अजून 6 महिन्यानंतर आहे. मी सदैव सगळ्या लोकांसाठी झगडत आलोय.

माझ्या पराभवासाठी विरोधकांनी काहीही करायची तयारी दाखवली आहे. हीच खरी संधी आहे पैशाची मगरूरी आणि सत्तेची घमेंड असणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची. करवीर मतदारसंघातील सुज्ञ मतदारांना ही संधी असून लोकसभेला आपल्या शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिकांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणू असेही यावेळी नरके यांनी म्हटले आहे. शिवाय मी गोकुळ मल्टीस्टेट होऊ नये म्हणून संघर्ष केला. जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा संघ त्यांच्याच मालकीचा राहावा यासाठी हा संघर्ष केला. ज्या गोकुळ संघासाठी हे एवढे करतात मग या गोकुळमध्ये असं काय आहे, असा सवाल व्यक्त करत पैशाच्या आणि सत्तेच्या मस्तीवर माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य धडा शिकवू, असेही नरके यांनी यावेळी म्हटले आहे.

आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी कुठले मुद्दे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये येतात हे पाहावे लागणार आहे. तसेच या मुद्द्यांवर कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे यात मात्र शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)