अंतिम मतदार यादी तयार : वडगावशेरीत सर्वाधिक मतदार
पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातील अंतिम मतदार यादी तयार झाली असून या यादीनुसार पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 74 हजार 861 मतदार आहेत. हे मतदार पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार ठरविणार आहे. दरम्यान शहरात सर्वाधिक मतदारांची संख्या वडगाव शेरी मतदारसंघात असून या मतदारसंघात 4 लाख 44 हजार मतदार आहेत. दरम्यान, पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यात मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. आता नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांची नावे पुरवणी मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे सहा मतदारसंघ येतात. सर्वाधिक मतदार वडगाव शेरीमध्ये असून त्याखालोखाल कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे. सर्वाधिक महिला मतदारांची संख्याही वडगावशेरीमध्ये आहे. याबरोबरच कसबा मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.