…तर विराट कोहलीवर दडपण आणता येईल 

भारतीय फलंदाजांच्या अपयशावर इंग्लंडच्या प्रशिक्षकांची टिपण्णी 

बर्मिंगहॅम: बहुचर्चित पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभ्व करताना इंग्लंडने मायदेशातील विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणला. तसेच एक हजार कसोटी सामने खेळणारा पहिला संघ असा मान मिळवितानाच इंग्लंडने या कसोटीत विजयाला गवसणी घालताना इतिहासात आपल्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवली. तरीही भारतीय कर्णधार विराट कोहलीचा अफलातून फॉर्म ही इंग्लंडच्या संघव्यवस्थापनासाठी चिंतेचीच बाब आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघ या मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. परंतु विराट कोहलीला लवकर बाद करण्यात यश मिळविल्यास भारताला रोखता येईल हे हेरून इंग्लंडच्या संघव्यवस्थापनाने त्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली आहे. परंतु दोन्ही डावांत भारताची अवस्था बिकट असतानाही विराट कोहलीने दडपण झुगारून देत पहिल्या डावांत शतक, तर दुसऱ्या डावांत झुंजार अर्धशतक झळकावले होते. कोहलीला दसऱ्या बाजूने एकाचीही साथ मिळाली असती, तर या कसोटीचा निकाल वेगळा लागला असता.

त्यामुळेच विराटला दडपणाखाली ठेवून लवकरात लवकर बाद करण्यासाठी इंग्लंडचे संघव्यवस्थापन विचार करीत आहे. भारताचे इतर फलंदाज पहिल्या कसोटीत सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे त्यांच्यावर आता दडपण असणारच आहे. हे दडपण जास्तीतजास्त वाढवून बाकीच्या फलंदाजांचे अपयश कायम ठेवण्यात इंग्लंडने यश मिळविल्यास विराटवरील दडपणही वाढत जाईल आणि अखेर तोही कुठेतरी जडपणाला बळी पडेल, असे समीकरण इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी मांडले आहे.

अर्थात हे काही जगावेगळे आहे असे नव्हे. भारतीय संघात ज्याप्रमाणे काही खेळाडू अद्याप संघातील स्थान निश्‍चित करण्यासाठी धडपडत आहेत, त्याप्रमाणेच इंग्लंडच्या संघातील काही खेळाडूही जम बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या अपयशामुळे जो रूट किंवा जॉनी बेअरस्टो यांच्यासारख्या अव्वल फलंदाजांवर दडपण येते, असे सांगून बेलिस म्हणाले की, याच धर्तीवर दुसऱ्या फळीतील फलंदाजांवर दडपण आणल्यास त्यांच्या अपयशाबरोबरच विराट कोहलीवरील दडपणही वाढत जाईल आणि आमच्या गोलंदाजांची कामगिरी सोपी होत जाईल.

दोन्ही संघ डावपेच उलटविण्यास उत्सुक 

भारतीय संघ पहिल्या कसोटीतील चुकांपासून धडा घेण्याचा प्रयत्न करणार हे जसे निश्‍चित आहे, तसेच आम्हीही त्यांचे डावपेच उलटविण्यासाठी उत्सुक आहोत. वेगवान गोलंदाजांचे हवेत स्विंग होणाऱ्या चेंडूंचा सामना कसा करायचा, हे कोडे सोडविण्यासाठी भारतीय संघव्यवस्थापन कसून प्रयत्न करणार. तसेच आम्हीही अश्‍विनच्या ऑफस्पिनचे कोडे सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या कसोटी मालिकेत वापरण्यात येत असलेले ड्यूक्‍स बनावटीचे चेंडू सध्याचे सर्वोत्तम कसोटी चेंडू असल्याच्या अश्‍विनच्या शेऱ्यावर ट्रेव्हर बेलिस यांनी सहमती व्यक्‍त केली. तसेच हे चेंडू वेगवान व फिरकी माऱ्यासाठी योग्य असून त्याचवेळी कोणत्याही फलंदाजाने त्याविरुद्ध तक्रार केलेली नाही. किंबहुना कसोटी क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या आणि अस्सल क्रिकेटशौकिनांना हे चेंडू अधिकच आवडतील, असेही त्यांनी नमूद केले.

डावखुऱ्या खेळाडूच्या निवडीला हरकत नाही 

एका न्यायालयीन प्रकरणाला हजर राहणे आवश्‍यक असल्यामुळे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्‍स दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. स्टोक्‍सच्या जागी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्‍सची निवड करण्यात आली असून डेव्हिड मेलनच्या जागी केवळ 20 वर्षीत ऑलिव्हर पोपला संधी मिळाली आहे. परंतु पोपच्या निवडीमुळे इंग्लंडच्या फलंदाजांच्या फळीत आणखी एका डावखुऱ्या फलंदाजाचा समावेश झाला आहे. अश्‍विनला त्यामुळे आनंदच झाला असेल, असे म्हटल्यानंतर बेलिस म्हणाले की, अश्‍विन उजव्या आणि डावखुऱ्या असा दोन्ही फलंदाजांना चांगलाच मारा करीत आहे. अर्थातच डावखुऱ्या फलंदाजांना त्याची गोलंदाजी थोडी अधिक जपून खेळावी लागत आहे. परंतु अश्‍विनच्या भीतीने आम्ही केवळ उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या दुय्यम दर्जाच्या खेळाडूंची निवड  करणार नाही. स्टोक्‍सने पहिल्या कसोटीत अफलातून कामगिरी केली असून त्याची जागा घेणाऱ्या खेळाडूवर त्याच तोडीची कामगिरी करण्याची जबाबदारी आणि दडपणही राहील, अशी कबुली त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)