माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस ; पोलिसांच्या कारवाईमुळे यशवंतराव गडाख व्यथित

नगर: पन्नास वर्ष राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतो. या काळात असंख्य आव्हाने व निवडणुकांचा सामना केला. जनतेच्या प्रश्‍नांसाठी संघर्ष करतांना कधी मागे पुढे पाहिले नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने व चळवळी केल्या, म्हणून अनेक वेळा पोलीस कारवायांचा सामना करावा लागला. पण परवा पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई करण्यास भाग पाडण्यात आले ते अत्यंत क्‍लेशदायक असून तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याची खंत ज्येष्ठ नेते व साहित्यीक यशवंतराव गडाख यांनी व्यक्‍त केली.

यासंदर्भात गडाख यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, माजी आमदार शंकरराव गडाख यांनी काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर नेवासे तालुक्‍यातील वडाळा येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणात त्यांच्यावर व इतर कार्यकर्त्यांवर नेवासे न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांना न्यायालयात हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांनी दिले. या सर्व कायदेशिर प्रक्रियेविषयी दुमत नाही. परंतू त्यांची अंमलबजावणी करण्याची पद्धत आणि पोलिसांचा अतिरेक अत्यंत चुकीचा होता. असे माझे मत आहे.

शंकरराव गडाख यांनी लोकांच्या प्रश्‍नासाठी आंदोलन केले. एवढेच कारण या प्रकरणात आहे. या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही पण अशा सविनय कायदेभंग च्या चळवळीतून उभे राहिले हा इतिहास आहे. मग हा अतिरेक कुणाच्या इशाऱ्यांवर व आदेशावरून करण्यात आला हा खरा प्रश्‍न असल्याचे गडाख म्हणाले.

पाच दशकांच्या राजकारणात अनेकांनी मला व मी अनेकांना राजकीय विरोध केला. पण त्याचह मर्यादा आणि पद्धत यांचे भान सर्वांनी नेहमीच ठेवले. त्याला वैयक्‍तिक आणि कौटुंबिक स्वरूप कधी येऊ दिले नाही. आता मात्र असे सुडात्मक राजकारण करणाऱ्यांचा दर्जा आणि पद्धत अत्यंत हीन झाली आहे. हे मला खेदाने नमुन करावे लागत आहे. पोलीस अपाल्या घरात का आले? या माझ्या छोट्या नातवंडांनी विचारलेल्या प्रश्‍नावर मी काल निरूत्तर झालो. समाजाने आता अशा प्रकारंवर उदासिनता दाखविली आणि मौन बाळगले तर असे प्रकार पुढे वाढतच जाणार. त्यातूनच हे घडवून आणणाऱ्यांचा कारस्थानी उद्देश उबंरठा ओलांडण्याचा प्रयत्न केला. उद्या तो उबंरठा तुमच्या घराचा असू शकेल. आणि आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने तो अत्यंत घातक असेल, ही लोकशाही टिकविण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील, सर्व पक्षातील लोकांनी जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्याबद्दल मी आभार मानतो असे गडाख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)