कासुर्डी ते बोरीऐंदी साईडपट्टयांचे काम रेंगाळले

ठेकेदार व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अपघातांची संख्या वाढली

यवत – कासुर्डी ते बोरीऐंदी (ता. दौंड) या दरम्यानच्या जिल्हा मार्गाचे काम झाले आहे. मात्र, या रस्त्याचे काम होऊन दोन-तीन महिने होऊन गेले तरी संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील साईडपट्ट्या न भरल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, तसेच बोरीऐंदी ते डाळिंब दरम्यानच्या रस्त्याचे काम मंजूर होऊन सात ते आठ महिने झाले असताना ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हे काम अद्याप सुरू झाले नाही. याकडे अधिकारी वर्गाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पुणे – सोलापूर महामार्गापासून जाणाऱ्या कासुर्डी ते डाळिंब या साधारणतः आठ किलोमीटर अंतरादरम्यानची रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या दरम्यानच्या रस्त्याचे काम व्हावे, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार शासनाने या रस्त्यासाठी 2 कोटी 32 लाखांचा निधी मंजूर केला. त्यानुसार संबधित ठेकेदाराने कासुर्डी ते बोरीऐंदी या पाच किलोमीटर रस्त्याचे काम केले, तर बोरीऐंदी ते डाळिंब या पाच किलोमीटर अंतराचे काम अद्याप सुरू झालेले नाही. कासुर्डी ते बोरीऐंदी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन देखील दोन ते तीन महिने होऊन गेले. मात्र, दोन्ही बाजूकडील साईडपट्ट्या अद्याप भरल्या गेल्या नाहीत.

काही ठिकाणी तर अर्धा ते एक फुटांपर्यंत रस्त्याच्या बाजूला खड्डे असून, सध्या पावसाळा सुरू असल्याने वाहनधारकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम होऊन तीन महिने उलटून गेले तरी साईडपट्टया न भरल्याने संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील साईडपट्ट्याचे काम त्वरित पूर्ण करावे व बोरीऐंदी ते डाळिंब दरम्यानचे रखडलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारक प्रवासी करीत आहेत.

टेंडरमध्येच काम नाही
या रस्त्याचे ठेकेदार राजेंद्र कांचन यांना विचारले असता टेंडरमध्ये साईडपट्टयांचे काम प्रस्तावित नसल्याचे त्यांनी सांगितले.

कासुर्डी ते डाळिंब दरम्यानच्या रस्त्याचे काम पावसाळा सुरू होऊनही संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले नाही. झालेल्या कामाचा दर्जा बरोबर नाही. साईडपट्ट्या पूर्ण केल्या नाहीत. ज्या साईटपट्ट्या भरल्या आहेत त्या रुंद नाहीत. कासुर्डी तलावालगत तीव्र उतार असून त्या ठिकाणी रस्ता रुंद केला नाही, त्यामुळे तेथे अपघाताचा धोका आहे. रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला राखला गेला नाही तर जनतेच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल.
– तात्यासाहेब ताम्हाणे, तालुका अध्यक्ष, भाजप, दौंड

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)