सर्वेक्षण संस्था स्टेसालाईट सिस्टिमवर कारवाईचे आदेश
नगर: महापालिका हद्दीतील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्णच आहे. अद्यापपर्यंत 85 हजार मालमत्तांचे सर्वेक्षण झाले असून, त्याची संपूर्ण माहितीही संबंधित कंपनीने महापालिकेला दिली नाही. त्यामुळे या ठेकेदार संस्था स्टेसालाईट सिस्टिम लिमिटेड विरोधात करारनाम्यातील अटी-शर्तीनुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिले.
स्टेसालाईट सिस्टिम लिमिटेड या संस्थेला महापालिकेतर्फे दि. 24 डिसेंबर 2013 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. दोन वर्षांच्या कालावधीत शहरातील मालमत्ता, रस्ते, ओढे, नाले, मोकळ्या जागांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली होती. संस्थेला अद्यापपर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, संस्थेकडून अद्यापपर्यंत शहरातील केवळ 85 हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 50 हजार मालमत्तांच्या सर्वेक्षणाची माहिती तपासणीसाठी सादर केलेली आहे. उपायुक्त सुनील पवार यांनी या संदर्भात बैठक घेऊन उर्वरित 35 हजार फॉर्म 28 जानेवारी 2019 पर्यंत महापालिकेकडे जमा करण्याच्या सूचना संस्थेला दिल्या होत्या. अर्धवट अवस्थेतील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
रखडलेल्या कामाच्या नियोजनासाठी संपर्क करुनही संस्थेचे प्रतिनिधी प्रतिसाद देत नाहीत. तसेच उर्वरित 35 हजार फॉर्मही त्यांनी रिव्हिजन विभागात जमा केलेले नाहीत. आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार संस्थेकडून कुठलीही कार्यवाही झालेली नसून, या उलट संस्थेमार्फत महापालिकेत कार्यरत असलेले दोन प्रतिनिधीही काढून घेण्यात आले आहेत. अद्यापही या प्रणालीचे मोठ्या प्रमाणात काम शिल्लक आहे. संस्थेकडून समाधानकारक काम होत नसल्याने व महापालिकेच्या सूचनेला कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा ठपका ठेवत करारनाम्यातील अटी – शर्तींनुसार संबंधित संस्थेवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त भालसिंग यांनी दिले आहेत.
बोल्हेगाव रस्ता प्रश्नीही नोटीस
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्त्याच्या कामासंदर्भातही आयुक्तांनी प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांना नोटीस काढली आहे. या रस्त्याचे काम का रखडले आहे, याचा संबधित ठेकेदाराकडून करारनाम्यातील अटी-शर्तींनुसार काम झालेले नसेल तर त्याच्यावर तातडीने कारवाई करावी असे आदेश आयुक्त भालसिंग यांनी शहर अभियंत्यास दिले आहेत.