नागरिकांना हव्यात सुविधा; प्राधिकरण सभेसमोर प्रस्ताव
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी घरे
सदनिका : 384, क्लब हाऊस व 16 रो-हाऊस
सदनिकांच्या कामासाठी कार्यादेश : जानेवारी 2019कामाची मुदत : 24 महिने
रो-हाऊसच्या कामासाठी निविदा कार्यवाही सुरू
सदनिकांसाठी अपेक्षित खर्च : 55 कोटी 80 लाख
रो-हाऊससाठी ढोबळ खर्च : 9 कोटी 99 लाख
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथील पेठ क्रमांक सहामध्ये उभारण्यात येणारा गृहप्रकल्प अन्यत्र स्थलांतरीत करावा, अशी नागरिकांची मागणी कायम आहे. नियोजित गृहप्रकल्पाच्या ऐवजी संबंधित जागेत विविध नागरी सुविधा प्राधान्याने पुरवाव्या, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून गृहप्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे. दरम्यान, संबंधित गृहप्रकल्पाबाबतचा प्रस्ताव सोमवारी (दि. 20) होणाऱ्या प्राधिकरण सभेसमोर अवलोकन व मार्गदर्शनासाठी ठेवला आहे.
पेठ क्रमांक सहामध्ये गृहप्रकल्प उभारण्याऐवजी संबंधित जागेत मुलांसाठी खेळाचे मैदान, उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आदी सुविधा उभाराव्या. प्राधिकरणाने पेठ क्रमांक सहामध्ये सध्या नियोजित असलेला गृहप्रकल्प पेठ क्रमांक 9, 11 किंवा 12 येथील मोकळ्या जागेत हलवावा. पेठ क्रमांक सहा येथील नियोजित गृहप्रकल्पाचा भाग लोकवस्तीच्या दृष्टीने मध्यवर्ती आहे. त्यामुळे संबंधित जागेत नागरिकांसाठी विविध सुविधा झाल्यास ते सोयिस्कर ठरेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी प्राधिकरण प्रशासनातर्फे 11 मार्चला एक बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी उपस्थित होते. त्या वेळी देखील संबंधित गृहप्रकल्प अन्यत्र हलवावा, या मागणीवर नागरिक ठाम होते. दरम्यान, 8 मे रोजी पुन्हा याबाबत प्राधिकरण कार्यालयात बैठक झाली. पेठ क्रमांक सहा येथील गृहप्रकल्प पेठ क्रमांक 12 येथे हलवावा, अशी मागणी आमदार लांडगे व स्थानिक नागरिकांनी संबंधित बैठकीत प्राधिकरण प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे आता 20 मे रोजी होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीत कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पेठ क्रमांक सहा येथील गृहप्रकल्प उभारण्यास प्राधिकरण सभेची मंजुरी आहे. संबंधित कामातंर्गत सदनिका उभारणीसाठी कार्यादेश दिलेले आहेत. प्रकल्पाला नागरिकांचा विरोध लक्षात घेता त्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरण सभेसमोर अवलोकनासाठी ठेवला आहे.
– संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता, प्राधिकरणगृहप्रकल्पाला आमचा विरोध नाही. तेथील जागेवर गृहप्रकल्प न करता नागरिकांसाठी उद्यान, विरंगुळा केंद्र, मुलांना खेळाचे मैदान आदी सुविधा द्याव्या. संबंधित जागा पेठ क्रमांक 9 व 6 यांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे ती नागरिकांसाठी सोयिस्कर आहे.
– निखिल कालकुटे, नागरिक