सिंधू, किदंबी, श्रीकांत यांची विजयी सलामी

साई प्रणीथचे आव्हान संपुष्टात; मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

कुआलालंपूर: भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि स्टार पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांत यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू झालेल्या मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र भारताचा गुणवान पुरुष खेळाडू साई प्रणीथचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. अनुभवी खेळाडू सायना नेहवालने कालच आकर्षक विजयासह दुसरी फेरी गाठली होती.
या स्पर्धेत तृतीय मानांकन देण्यात आलेल्या सिंधूने पहिल्या फेरीच्या लढतीत जपानच्या आया ओहोरीचा प्रखर प्रतिकार 26-24, 21-15 असा संपुष्टात आणताना महिला एकेरीतील दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सिंधूला हा सामना जिंकण्यासाठी 45 मिनिटे झुंज द्यावी लागली. सायनासमोर दुसऱ्या फेरीत मलिुेशयाची गुणवान युवा खेळाडू यिंग यिंग ली हिचे खडतर आव्हान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यिंग यिंग ली हिने पहिल्या फेरीच्या लढतीत तैपेई चीनच्या चियांग यिंग ली हिची कडवी झुंज 21-14, 19-21, 21-7 अशी 52 मिनिटांच्या लढतीनंतर संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली. महिला एकेरीतील अन्य लढतीत अग्रमानांकित तेई त्झु यिंगने इंग्लंडच्या सोनिया चिहचा 21-10, 21-9 असा फडशा पाडताना दुसऱ्या फेरीत धडक मारली. तर सातव्या मानांकित संग जी हयुन हिने इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानी हिचा प्रतिकार 21-11, 22-24, 21-12 असा मोडून काढताना विजयी सलामी दिली. हा सामना एक तास 9 मिनिटे रंगला.

गेल्या वर्षी चार सुपर सेरीज स्पर्धा जिंकून विश्‍वविक्रमाशी बरोबरी साधणाऱ्या किदंबी श्रीकांतने डेन्मार्कच्या यान ओ जॉर्गन्सेनचा 21-18, 21-9 असा केवळ 31 मिनिटांत पराभव करताना पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. परंतु साई प्रणीथला वांग त्झु वेईकडून 12-21, 7-21 असा केवळ 32 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. याआधी भारताच्या समीर वर्माला इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तोविरुद्ध सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला होता.

मिश्र दुहेरीतील महत्त्वाच्या लढतीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्‍की रेड्डी या बिगरमानांकित भारतीय जोडीला पहिल्या फेरीत झेंग सिवेई व हुआंग याक्‍वियांग या चतुर्थ मानांकित चिनी जोडीकडून 16-21, 12-21 असा केवळ 31 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. तसेच सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व चिराग शेट्टी या अव्वल भारतीय जोडीला पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत ताकुतो इनोयू आणि युकी कानेको या सातव्या मानांकित जपानी जोडीकडून 16-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. रोहन कपूर व कुहू गर्ग या भारतीय जोडीलाही हे जिटिंग व हे युए या चीनच्या आठव्या मानांकित जोडीविरुद्ध 9-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)