विम्बल्डन – अजिंक्यपदासाठी उत्सुक असलेल्या नोवाक जोकोवीच व केविन अँडरसन यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. माजी ग्रॅंड स्लॅम विजेता स्टॅनिस्लास वॉवरिंक याला पराभवाचा धक्का बसला. महिलांमध्ये अग्रमानांकित ऍशलीघ बार्टी व स्लोएनी स्टीफन्स यांनीही आव्हान राखले.
सर्बियन खेळाडू जोकोवीच याने अमेरिकन खेळाडू डेनिस क्युडला याच्यावर 6-3, 6-2, 6-2 असा दणदणीत विजय मिळविला. त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ करीत डेनिसला फारशी संधी दिली नाही. गतवर्षी उप्विजेतेपद मिळविणाऱ्या अँडरसन याने जान्को तिप्सेरेविक याचे आव्हान 6-4, 6-7 (5-7), 6-1, 6-4 असे संपुष्टात आणले. त्याने परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. अमेरिकेच्या रिली ओपेन्का याने 23 वेळा बिनतोड सर्व्हिस करीत वॉवरिंक याच्यावर आश्चर्यजनक विजय मिळविला. क्रीडा क्षेत्रातील सर्वात उंच खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या रिली याने हा सामना 7-5, 3-6, 4-6, 6-4, 8-6 असा जिंकला. 6 फूट 11 इंच उंच असलेल्या या खेळाडूला तिसऱ्या फेरीत मिलोस राओनिक याचे आव्हान असणार आहे.
बार्टी हिने परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग करीत बेल्जियमच्या ऍलिसा व्हान युटीव्हान्स हिचा 6-1, 6-3 असा दणदणीत पराभव केला. स्टीफन्स हिने चीनच्या यिफान वॉंग हिच्यावर 6-0, 6-2 असा सफाईदार विजय मिळविला. तिने पासिंग शॉट्सचा सुरेख खेळ केला. चीनच्या क्विआन वॉंग हिने अपराजित्व राखले. तिने स्लोवेनियाच्या तामारा झिदान्सेक हिला 6-1, 6-2 असे पराभूत केले. कोरी गॉफ हिने सनसनाटी विजयाची मालिका कायम राखली. तिने मॅगडेलिना रिबारीकोवा या अनुभवी खेळाडूला 6-3, 6-3 असे चकित केले. पहिल्या फेरीत तिने माजी विजेत्या व्हीनस विल्यम्स हिच्यावर शानदार विजय मिळविला होता.