बदलाचे वारे पुन्हा घोंगावतय ! ; खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग

रामचंद्र सोनवणे 

जस जशा लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसा खेड तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग येवू लागला आहे. आरोप प्रत्यारोप आणि विकासकामांच्या उद्‌घाटनांचा वेग वाढला आहे. अनेक जण निवडणुकीसाठी इच्छुक बनले आहेत, तर अनेकांना उभे करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. व्यासपीठावरून आरोप प्रत्यारोप करण्याचे वाद पुढे येत आहेत. अनेक जणांनी जनमत अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. विधानसभा निडणुकीत तालुक्‍यात पुन्हा एकदा बदलाचे संकेत दिसू लागले आहेत.

खेड तालुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा तालुका म्हणून पहिले जाते. लोकसभेत नेहमीच विजयी उमेदवाराला बहुमत देणारा तालुका आहे. तालुक्‍यात लोकसभेला कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढून शिवसेनेच्या मागे हा तालुका गेली तीन टर्म उभा आहे, तर विधानसभेच्या इतिहासात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मोडीत काढून जनतेने बदल घडवीत शिवसेनेच्या हाती सत्ता दिली आहे. अत्यंत चुक्षीचे राजकारण या तालुक्‍यात होते. मतदारांनी ठरवले तर बदल दाखविणारा हा तालुका आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागता असताना होणाऱ्या चर्चेत शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव पुढे येत आहे. त्यातच यावर्षी राजगुरुनगर येथे शहराला जोडणारा भीमा नदीवरील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पुलाचे उद्‌घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेली सभा लक्षवेधी ठरली आहे. शिवसैनिकांना नवा उत्साह देणारी ही सभा झाली. लोकसभा आणि विधानसभा आगामी निवडणुकीची ही तयारी असावी अशी अनेकांनी मते व्यक्‍त केली. त्यात तथ्यही आहे. आढळराव पाटील याच्या विरोधी उमेदवाराची सध्यातरी घोषणा झाली नसल्याने आढळराव यांचेच नाव जनतेत चर्चेला आहे. याच सभेत विधानसभेसाठी शिवसेनेत दोन उमेदवार तयार झाल्याचे दिसून आले. विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्यासाठी ही सभा फायद्याची ठरली असली तरी त्यात रामदास ठाकूर यांनी केलेले शक्तीप्रदर्शन राजकीय चर्चेला उधाण आणून गेले. त्यानंतर ठाकूर यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि विद्यमान आमदार गोरे यांच्यावर ठाकूर यांनी केलेले आरोप यामुळे तालुक्‍यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर ठाकूर यांना पक्षाने तिकीट नाही दिले तरी अपक्ष लढण्याचे संकेत दिले असल्याने शिवसेना काय निर्णय घेणार याकडे साऱ्या राजकीय विश्‍लेशकांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षात कमालीची शांतता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हेच सध्यातरी एकमेव उमेदवार चर्चेत असल्याने तालुक्‍यात त्रिशंकू निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. आपल्या कार्य कुशलेतेवर सलग दोन वेळा मोहिते हे निवडून आले. मात्र तालुक्‍यात बदलाचे वातावरण असल्याने त्यांना जनतेने नाकारले होते. 2014 ला जसा बदल झाला तसा 2019 च्या निवडणुकीत बदल घडण्याची चाहूल व संकेत निर्माण झाले आहेत. यावेळी मात्र जनता कोणाला स्वीकारेल हे मात्र निवडणुकीतच ठरणार आहे.

एकंदरीत तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीआधी राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भाजप पक्ष सध्या तरी शांत आहे, जोपर्यंत युती आहे. त्यांनी गावागावात छुपे मनसुबे तयार केले आहेत. ऐनवेळी भाजप मान वर काढून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही, अशी चर्चा आहे. तालुक्‍यात विधानसभेसाठी इतरही इच्छुक उमेदवार आहेत. मात्र ते त्यांचे पत्ते निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच ओपन करतील अशी स्थिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतरच विधासभेचे चित्र स्पष्ट होणार आहे, हे मात्र नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)