पाणलोट क्षेत्र विकासावर भर देणार

पुणे – जलशक्ती अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. एक जुलैपासून या अभियानास देशभरात सुरुवात झाली असून पुरंदर व शिरूर या तालुक्‍यांतील भूजलाची स्थिती लक्षात घेता तिथे ही मोहीम राबवली जाईल, अशी माहिती केंद्रीय सहसचिव सुक्षमा शेटे यांनी दिली.

जलशक्ती अभियानाबाबत मार्गदर्शनासाठी केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांच्या पथकाने जिल्हा प्रशासनाशी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. त्यावेळी शेटे बोलत होत्या. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपवनसंरक्षक ए. लक्ष्मी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेटे म्हणाल्या, भूजलाची पातळी खालावलेल्या भागांत लक्ष केंद्रित करून रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक जलस्रोतांचे नूतनीकरण, पुनर्वापर व वनीकरण, तसेच यासाठी अधिक लोकसहभाग वाढविण्यात येणार आहे. या मोहिमेत केंद्र शासनाची विविध मंत्रालये, राज्य शासन व विविध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा सहभाग आहे. स्वयंसेवी संस्थांचेही मोहिमेला सहकार्य घेतले जाणार आहे.

दीर्घकालीन विचार करून आराखडा तयार करा, असे सांगून शेटे यांनी गावातील पाणीस्रोत, पीकपद्धती, ठिंबक सिंचनाची स्थिती, तालुकानिहाय झालेली कामे, व्हावीत अशी कामे व गरजेची कामे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.
पुणे जिल्ह्यात अलीकडच्या काळात पाण्याची पातळी खालवली आहे. या पार्श्‍वभूमीवर जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

जलसंवर्धन आराखडा तयार करणार
जिल्हाधिकारी राम म्हणाले, जलसंवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन मिळून हे अभियान राबविले जाणार आहे. जलसंकटावर मात करणे हा जलशक्ती अभियानाचा मुख्य हेतू आहे, जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना आदींवर भर दिला जाणार आहे. जलसंवर्धन आराखडा तयार करून त्यानुसार या भागात आवश्‍यक कामे केली जाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here