जलपर्णी काढली अन्‌ तेथेच टाकली!

महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रताप : पद्धतही अशास्त्रीय

पुणे – पावसामुळे शहरातील नदी प्रवाहित झाली असून, त्याबरोबरच नदीत सर्वत्र जलपर्णीचा संचार वाढला आहे. मंगळवारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीपात्रात सर्वत्र जलपर्णी काढण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांनी हाती घेतले. मात्र, ती काढून पुन्हा तेथेच टाकण्याचा प्रकार यावेळी दिसून आला. अशास्त्रीय पद्धतीने जलपर्णी काढत असल्याने ती पुन्हा फोफावण्याचा धोका वाढत आहे.

अस्वच्छ पाण्यावर जगणारी, जलपरिसंस्थेला घातक असलेल्या जलपर्णी वनस्पतीचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतून वाहणाऱ्या मुळा, मुठा, रामनदी, इंद्रायणी या नद्यांसह कात्रज आणि पाषाण या तलावांमध्ये दर वर्षी मोठ्या प्रमाणावर जलपर्णी निर्माण होते.
जलपर्णी काढण्याचे काम दरवर्षी होते. मात्र, पारंपारिक काढणी पद्धतीद्वारे जलपर्णी समूळ नष्ट होत नाही. इतकेच नव्हे, तर चुकीच्या पद्धतीने काढलेल्या या जलपर्णीची योग्य विल्हेवाटही लावली जात नसल्याने दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

जलपर्णी ही मुळात अस्वच्छ पाण्यावर वाढणारी वनस्पती असून ती पाण्यातील ऑक्‍सिजन शोषून घेते. तसेच जलपर्णीच्या दाट थरामुळे सूर्यकिरण पाण्यात पोहचू शकत नाही. त्यामुळेच पाण्यातील जीवांसाठीही घातक आहे. जलपर्णीचे अत्याधिक प्रमाण हे पाण्याचे अस्वछतेचे लक्षण असून, जोपर्यंत प्रक्रियाविरहित सांडपाणी नदीत सोडले जाणे थांबणार नाही, तोपर्यंत जलपर्णी नष्ट करणे अशक्‍य आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्‍त करत आहेत.

जलपर्णी काढण्यासाठी आपल्याकडे अजूनही माणसांना कामाला लावले जाते. अस्वछ पाण्यात उतरून ही जलपर्णी काढणे जितके किचकट आहे, तितकेच आरोग्यासाठी घातकही आहे. जलपर्णी काढण्याच्या नवनवीन तंत्रज्ञानाबाबत संशोधन झालेच पाहिजे. याव्यतिरिक्त नदीतून काढलेल्या जलपर्णीचा इतर उत्पादनासाठी वापर केल्यास तो फायदेशीर ठरू शकतो. खतनिर्मिती, इंधननिर्मिती, वीट निर्मिती अशा विविध गोष्टींसाठी जलपर्णीचा वापर शक्‍य आहे. त्यामुळे महापालिकेने या गोष्टींकडे लक्ष द्यावे.

– अदिती देवधर, पर्यावरण अभ्यासक

जलपर्णी ही विदेशी वनस्पती आहे. अमेरिकेत या वनस्पतीला खाऊन जगणारे कीटकही आहेत. त्यामुळे तिथे याचा फारसा दुष्परिणाम आढळत नाही. भारतात मात्र जलपर्णीवर जगणारा कीटक अद्याप तरी आढळलेला नाही. तसेच ही वनस्पती एकाच वेळी अनेक बीजनिर्मिती करते. तसेच तिचे वयोमान सुमारे 28 वर्षे आहे. यामुळे ही वनस्पती पुन्हा मूळ धरते. त्यामुळेच जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी, तिची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन होप्णे गरजेचे आहे.

– डॉ. सचिन पुणेकर, वनस्पतीशास्त्र अभ्यासक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)