नव्याने बांधलेल्या इमारतीचे सांडपाणी मानवी वस्तीत

न्यू विकासनगर येथील प्रकार : आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

सातारा – न्यू विकासनगर (खेड) येथे नव्या बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील सांडपाण्याची व्यवस्था संबंधित बिल्डरने केलेली नाही. त्यापूर्वीत इमारतीत नागरिक रहावयास आले आहे. त्यामुळे या इमारतीच्या सांडपाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून संबंधित बिल्डरने हे सांडपाणी इमारतीपासून खोदकाम करुन एका गृहनिर्माण सोसायटीत सोडले आहे. या सोसायटीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या दारातुनच हे सांडपाणी वाहत असल्याने सोसायटीत दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यू विकासनगर (खेड) येथे एका राजकीय व्यक्तीच्या मुलाने अपार्टमेंट बांधले आहे. मात्र, या अपार्टमेंटमधील सांडपाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तरीही या अपार्टमेंटमध्ये ज्यांनी फ्लॅट खरेदी केले आहेत ते कुटुंबासमवेत वास्तव्यासही आले आहेत. त्यामुळे अपार्टमेंटमधून येणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परंतु, संबंधित बिल्डरने हे सांडपाणी खोदकाम करुन अपार्टमेंटनजीकच असणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये सोडले आहे.

विशेषत: ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची बोअर आहे त्याठिकाणी हे पाणी साठत असल्याने पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी याप्रकरणी संबंधित बिल्डरकडे अपार्टमेंटमधून येणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली असता त्याच्याकडुन या नागरिकांनाच दमदाटी केली जात आहे. एकंदरीतच या सर्व प्रकारावरुन याठिकाणी गुंडाराज सुरु झाले आहे की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)