दैनंदिन वाहन चाचणी कोट्यात वाढ करण्याचा आरटीओचा निर्णय
पुणे – आरटीओकडून वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) घेणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने परवान्याची “प्रतीक्षा यादी’ देखील वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यालयाने येत्या मंगळवारपासून (दि.16) दैनंदिन वाहन चाचणी कोट्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरटीओकडून पक्के लायसन्स काढण्यासाठी ट्रॅकवर वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येते. या चाचणीसाठी सुरुवातीला शिकाऊ लायसन्स काढणे आवश्यक असते. या उमेदवारांची संख्या सध्या वाढत असल्याने पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना चाचणीच्या तारखेची वाट पाहावी लागते. या परिस्थितीवर आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने उपाय शोधला असून, थेट दैनंदिन चाचणीचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भोसरी येथील आयडीटीआर येथील हलक्या वाहनाच्या लायसन्स चाचणीकरिता येणाऱ्या उमेदवारांचा दैनंदिन कोटा 60 ने वाढविण्यात आला आहे. यासह आळंदी रस्त्यावरील मैदानावर होत असलेल्या चाचणीचा कोटा 80 ने वाढविण्यात आला आहे.