मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो

शिरूर – जिल्हा निवडणूक विभागाच्या मतदान जागृती अभियानातंर्गत यशस्विनी सामाजिक अभियानाच्या वतीने शिरूर व हवेली कोर्टातील वकील, शेतावर काम करणाऱ्या मजूर, कामगार महिला, दुकानात आठवडे बाजारात भाजी विक्रेते, विद्यार्थी यापर्यंत जाऊन मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ या घोषणा देत यशस्विनीच्या महिलांनी शिरूर-हवेलीमध्ये शेतीच्या बांध्यावरील शेतकऱ्यापासून ते न्यायालयातील चेंबरमधील वकीलांपर्यंत मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

भाऊ, दादा, मामा, काका, आबा, अक्का, ताई, बाळा मतदान करा हो मतदान करा. अशा अठरा वर्षांच्या तरुणापासून ते अगदी नव्वदीच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना यावेळी मतदानाचे आवाहन करण्यात आले. गावागावांतील चावडीवर गप्पा मारत बसलेली मंडळी, शेतकरी, ग्रामस्थ पुणे-नगर रस्त्यावरील दुकानदार, कामगार, मजूर या सर्व घटकांना मतदानाविषयीचे महत्त्व सांगणाऱ्या माहितीपुस्तिकेचे यावेळी वाटप करण्यात आले. शिरूर शहरात बाजार समिती आवारात भरलेल्या आठवडे बाजारातही मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.

शिरूर न्यायालय आवारातील वकील मंडळींनाही मतदानाचे आवाहन करण्यात आले. यशस्विनीच्या अध्यक्षा दीपाली शेळके, उपाध्यक्षा संगीता मल्लाव, सचिव नम्रता गवारी, पुष्पा जाधव, शिवानी धवन, पायल गव्हाणे, कल्याणी गायकवाड, कल्पना सामंत, ललिता पाताशे, निशा जगधने, भारती गायकवाड, निलम अवचित, नंदा साई, सुनिता ढवळे तसेच विजय काळूराम गव्हाणे, संतोष शिंदे यांनी या मतदान जागृती अभियानात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)