संघ विचारांच्या प्रसारासाठी शिक्षण क्षेत्राचा उपयोग निंदनीय

नागपूर विद्यापीठाचा कॉंग्रेसकडून निषेध

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीमध्ये संबंध काय?असा सवाल उपस्थित करत सत्तेचा गैरवापर करुन संघाची कितीही भलामण करण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य लपणार नाही. मात्र, शिक्षण क्षेत्राचा उपयोग संघ विचारधारेचा प्रसार करण्यासाठी केला जात आहे हे निंदनीय आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

नागपूर विद्यापीठाने कला शाखेच्या दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमात “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे राष्ट्रनिर्मितीमधील योगदान’, हा विषय समाविष्ट केला आहे. या संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सगळ्यात मोठी विभाजनकारक शक्ती आहे.

या संघटनेचा इतिहास हा पूर्णपणे काळा असून तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसमोर येणे आवश्‍यक आहे. ब्रिटीशांबरोबर संगनमत करून स्वातंत्र्य संग्रामाचा केलेला विरोध, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यापासून इच्छुक स्वयंसेवकांना परावृत्त करणे, 1942 चे चलेजाव आंदोलन हाणून पाडण्याकरता ब्रिटीशांना केलेली मदत, हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतिक आहेत. स्वातंत्र्य मिळण्याच्या कालावधीमध्ये संविधानाऐवजी मनुस्मृती ग्रंथाचा केलेला पुरस्कार, भारतीय तिरंगा झेंड्याला अशुभ म्हणून 52 वर्षे स्वतःच्या कार्यालयावर न फडकवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राहिलेले आहे, असे चव्हाण म्हणाले.

गेली अनेक वर्ष देश धर्मनिरपेक्ष असताना हिंदू राष्ट्राची प्रार्थना खुलेआमपणे केली जाते. खऱ्या अर्थाने जर विद्यार्थांना आरएसएसची माहिती द्यायची असेल तर त्यांच्यावर तीनदा बंदी का घातली गेली? हा अभ्यासक्रमही त्यांनी शिकवावा अशी कोपरखळी चव्हाण यांनी मारली. सत्तेचा गैरवापर करुन संघाची कितीही भलामण करण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य लपणार नाही, असेही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)