ओसामा बिन लादेनचा विषय इतिहासजमा झाल्याचा दावा
इस्लामाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या बाबतीत केलेल्या विधानावर आज पाकिस्तानने आगपाखड केली. पाकिस्तानचे विदेश सचिव तेहमिना जांजुआ यांनी अमेरिकेच्या दूतावासातील प्रभारी पॉल जोन्स यांच्याकडे ट्रम्प यांच्या वक्तव्याविषयीचा निषेध नोंदवला. ट्रम्प यांनी ओसामा बिन लादेनबाबत केलेले आरोप बिनबुडाचे असून हा विषय इतिहासजमा झाला आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे द्विपक्षीय संबंध बिघडू शकतील, असे पाकिस्तानने अमेरिकेच्या दूतावास प्रभारींना सुनावले.
पाकिस्तानची लक्षावधी डॉलरची लष्करी मदत रोखण्याचे समर्थन ट्रम्प यांनी रविवारी केले. पाकिस्तानने दहशतवादाला संपवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत आणि अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानने एबोटाबादमध्ये आश्रय दिला होता. लादेन पाकिस्तानमध्ये रहात असतानाच अमेरिकेने पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलरची मदत दिली होती. दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी आता यापुढे ही मदत दिली जाणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा