26/11 नंतर युपीए सरकारने पुरेशी उपाय योजना केली नाही- सितारामन

नवी दिल्ली – मुंबईवर झालेल्या “26/11’च्या हल्ल्यानंतर “युपीए’ सरकारने पुरेशा उपाय योजना केल्या नाहीत. अशा दहशतवादी हल्ल्यांबाबत पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती. अशा उपाय योजना अधिक सक्रिय व्हायला हव्या होत्या, अशी टीका सरंक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी केली आहे. दिल्लीतील भाजप कार्यकर्त्यांशी सितारामन बोलत होत्या. बालाकोट हवाई कारवाईवर उपस्थित होत असलेल्या शंकांमुळे विचलित होऊ नये. या मुद्दयावर बचावात्मक राहण्यापेक्षा आक्रमक पवित्रा घ्यावा, अशी सूचनाही सितारामन यांनी कार्यकर्त्यांना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच दहशतवादाबाबत “झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बालाकोटवरील हवाई कारवाईसंदर्भातील प्रश्‍नांना उत्तर देताना सितारामन यांनी कारगिल युद्धाची आठवण करून दिली. कारगिल युद्धादरम्यान मारल्या गेलेल्या सैनिकांचे मृतदेहही पाकिस्तानने स्वीकारले नाहीत. त्या सैनिकांची जबाबदारीही पाकिस्तानने घेतली नाही. त्या सैनिकांच्या मृतदेहांचे दफन भारतातच केले गेले. त्यामुळे दहशतवादी अड्डयांची जबाबदारीही पाकिस्तान स्वीकारेल, अशी अपेक्षाही करता कामा नये. “26/11’मधील दहशतवादी अजमल कसाबला जिवंतपनी पकडण्यात आले.

तरीही पाकिस्तानने तो पाकिस्तानी असल्याचे मान्य केले नव्हते, असे सितारामन म्हणाल्या. पुलवामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून कारवाई होण्याची भारताने 10-12 दिवस वाट बघितली. त्यानंतर दहशताद्यांकडून पुन्हा आत्मघातकी हल्ला केला जाण्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने हा हवाई हल्ला केला गेला. हे दहशतवादी अड्डे सीमेजवळ मात्र पाकिस्तानच्या हद्दीत होते. म्हणून हवाई हल्ला केला गेला. भारताने युद्ध पुकारले नव्हते, असे सितारामन यांनी स्पष्ट केले.

जैश ए मोहम्मदचा म्होरक्‍या मसुद अझहरला 1999 साली विमान अपहरण प्रकरणानंतर तुरुंगातून सोडण्याच्या निर्णयावरून कॉंग्रेसकडून होत असलेल्या टीकेचाही सितारामन यांनी समाचार घेतला. मसुदला सोडण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेतला गेला होता. पण पूर्वीच्या सरकारने 1994 ते 1999 पर्यंत काहीही कारवाई केली गेली नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)