पिंपरी – बंद पडलेली दुचाकी सुरु करीत असताना तिघांनी एकाला मारहाण करुन कोयत्याचा धाक दाखवत लुटले. ही घटना बुधवारी (दि. 15) बावधन येथील चांदणी चौक परिसरात घडली. मारहाण करणाऱ्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल फुलचंद माळी (वय-19), अशिष मारुती धनके (वय-19, दोघे रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. या दोघांचा साथीदार अद्याप फारार आहे. याप्रकरणी रविंद्र हिरमेठ (वय-49, रा.आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. रविंद्र हिरमेठ हे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बावधनमधून दुचाकीवर जात होते.
चांदणी चौकाजवळ त्यांची दुचाकी अचानक बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला थांबून ते दुचाकी दुरुस्त करीत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी रविंद्र यांना मारहाण करुन व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम असा सहा हजार रुपयांचा ऐवज घेवून पळ काढला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली आहे.