द्राक्षाने भरलेला ट्रक लोणंदजवळ पलटी

लोणंद – लोणंदजवळ तांबवे, ता. फलटण गावच्या हद्दीत सरदेच्या ओढ्या जवळ असलेल्या वेअर हाऊसनजीक द्राक्षाने भरलेला ट्रक पलटी झाला. सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सांगली येथून रात्री बारा वाजता निघालेला व द्राक्षाने भरलेला गोयल ट्रान्स्पोर्टचा व महंमद साजिदभाई खान (रा. हरियाणा) यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एच आर 55 एन 9642 हा लोणंदजवळ तांबवे गावच्या हद्दीत सरदेच्या ओढ्या नजीक शासकीय गोदामाच्या जवळ आल्यानंतर पलटी झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

या अपघातात सुदैवाने ट्रक चालकाला व क्‍लिनरला कसलीही गंभीर दुखापत झालेली नाही. याबाबत ट्रक चालक रफिक खान यांच्या म्हणण्यानुसार अचानकपणे ट्रकचे स्टिअरिंग लॉक झाल्याने त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि सदर अपघात घडला आहे. ज्या ठिकाणी ट्रक पलटी झाला तेथे ओढ्याचा पुल असून अगदी लागूनच मोठा व तीव्र उतार आहे. जर ट्रक अजून काही फूट पुढे गेला असता तर खुप मोठी दुर्घटना घडली असती.

दरम्यान, सध्या घडलेला अपघात हा तेथील रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळेच घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या रस्त्याचे काम करावे, अशी मागणीदेखील अपघाताच्यानिमित्ताने जोर धरु लागली आहे. या परिसरात वारंवार किरकोळ अपघाताच्या घटना घडत असतात. तसेच या रस्त्यावरुन वाहतूकीचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्दैवी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होण्याची आवश्‍यकता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)