कचरा ठेकेदाराच्या प्रतिनिधींना बैठकीतून हाकलले

महापौरांची भूमिका शहराचा मोशी कचरा डेपो होऊ देणार नाही

अहवाल सादर करण्याचे आदेश

ए.जी. एनव्हायरो या ठेकेदाराकडे कचरा संकलनासाठी वाहने कमी असल्याची बाब या बैठकीत चर्चिली गेली. त्यावर ही समस्या भेडसावणाऱ्या प्रभागातील सहाय्यक आरोग्य निरीक्षकांनी तशाप्रकारचा अहवाल आपल्या वरिष्ठांना सादर करावा. यामध्ये कोणतीही हयगय करु नये. सर्व अधिकाऱ्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर बाजू लक्षात घेऊन, ठेकेदारावरील कारवाईचे स्वरुप ठरविले जाणार आहे.

पिंपरी – शहरातील कचरा उचलण्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याने ऐन पावसाळ्यात निर्माण झालेली “कचरा समस्या’ ही सत्ताधारी आणि प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदाराकडून सुरू असलेल्या बेजबाबदारीचा महापालिकेच्या बैठकीत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त करण्यात आली. या बैठकीला उपस्थित असलेल्या ठेकेदाराच्या प्रतिनिधींना या बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. कामाचा ठेका भरलेल्या ठेकेदारानेच या बैठकीला उपस्थित रहावे, असे या प्रतिनिधींना सुनावले. शहरात कचरा संकलन योग्य प्रकारे होत नसल्याचे मान्य करत, महापौर राहुल जाधव यांनी या शहराचा मोशी कचरा डेपो होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

महापौर राहुल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका मुख्यालयात गुरुवारी (दि.11) बैठक पार पडली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, स्तायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील, आठ प्रभाग अधिकारी व सहाय्यक आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. शहराचे दोन भाग करत, उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स यांना कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे काम देण्यात आले आहे.

हे काम सुरु झाल्यापासून ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स कंत्राटदार करत असलेल्या दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहन या कामाच्या अनेक तक्रारी आहेत. या परिसरातील घरोघरचा कचरा संकलित केला जात नसल्याने समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या बैठकीत ठेकेदारच्या कामाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त करण्यात आली. तीन महिने विलंबाने या ठेक्‍याला सुरुवात झाली, तरीदेखील त्यामध्ये त्रुटी कशा राहिल्या ? असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)