भुईंजमधील कारखाना चौक ठरतोय मृत्यूचा सापळा

भुईंज – भुईंजमधील किसरवी कारखान्याकडे जाणाऱ्या चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असल्याने तसेच उड्डाणपुलाखालून आलेल्या वाहनांना सेवारस्त्याने आलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने याठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून हा चौक जणूकाही मृत्यूचा सापळाच ठरु लागला आहे. त्यामुळे याठिकाणी सेवारस्त्यावर, उड्डाणपुलाखाली आणि किसनवीर कारखाना रस्त्यावर असे तीन ठिकाणी गतिरोधक तयार करण्याची मागणी स्थानिकांसह वाहनधारकांमधून होत आहे.

भुईंज येथील कारखाना चौकामध्ये आजपर्यंत अनेक अपघात झाले असुन काहींना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. भुईंज ता. वाई येथील राष्ट्रीय महामार्गापासून साधारण 4 किमी अंतरावर किसनवीर सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याकडे जाणारा रस्ता हा महामार्गालगत असणाऱ्या सेवारस्त्याला दुभागून गेलेला आहे. याच सेवा रस्त्यावरून महामार्गापासून काही किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या देगांव, भिरडाचीवाडी, बदेवाडी, शिरगाव, किकली, खोलवडी, जांब, बेलमाची, मापरवाडी अशा आजूबाजूच्या गावातील हजारो नागरिक, शेकडो विद्यार्थी ये जा करतात व परिसरातील सर्व शेतकरी बांधव आपल्या शेत मालाची ने-आण करत असतात. विशेष म्हणजे परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांना भुईंजला येण्यासाठी याच चौकातून यावे लागते. त्यामुळे अनेकदा उड्डाणपुलाखालून आलेली वाहने तर अनेकदा सेवारस्त्याने आलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने याठिकाणी अपघाताच्या घटना घडतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाखाली तसेच सेवारस्त्यावर आणि कारखाना रस्त्यावरही गतिरोधक तयार करणे गरजेचे आहे. म्हणजे चौकात येताना वाहने सावकाश येतील आणि अपघात होणार नाहीत. दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने याठिकाणी गतिरोधक बांधावेत अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)