व्यापाऱ्यांची गाडी अडवून सव्वालाख लुटले

काचा फोडून केली मारहाण; काही तासांत दरोडेखोर जेरबंद

जामखेड –
राशीन व कर्जत येथील एच.यु. गुगळे कापड दुकानातील कापड विक्रीची रोकड घेऊन जामखेडला जाणाऱ्या व्यापाऱ्यांना पाटोदा शिवारात मोटारसायकलींवरून आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने गाडी अडवून गाडीच्या काचा फोडून व हाणमार करून, एक लाख तीस हजाराची रक्कम घेऊन पोबारा केला. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात दरोडेखोरांच्या टोळीला ग्रामस्थांच्या मदतीने जामखेड पोलिसांनी जेरबंद केले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राशीन व कर्जत येथील एच. यु. गुगळे या कापड दुकानातील दिवसभराची कापड विक्रीची रक्कम एक लाख तीस हजार रुपये घेऊन दुकानाचे सेल्समन, कॅशियर व इतर कामगार हे आपल्या चारचाकी गाडीमधून गुरूवारी (दि.25) रात्री साडेदहाच्या दरम्यान कर्जतकडून जामखेडकडे येत होते. याचवेळी पाठीमागून तीन मोटारसायकलवर आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीस आपल्या मोटरसायकली अडव्या लावून बियरच्या बाटलीने व लोखंडी कत्तीने गाडीच्या काचा फोडून कत्ती, चाकुने व हाताने गाडीतील लोकांना मारहाण करून, त्यांच्याकडील एक लाख तीस हजारांची रक्कम घेऊन पोबारा केला.

घटना घडल्यानंतर कारमधील फैय्याज शेख यांनी तत्काळ रस्त्याने जाणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरला घडलेला प्रकार सांगितला. ट्रक ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवून हा प्रकार जामखेड पोलीस व अरणगाव, पाटोदा येथील ग्रामस्थांना सांगितला. यानंतर पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार, सहायक पालीस निरीक्षक नीलेश कांबळे, पोलीस कर्मचारी नवनाथ भिताडे यांच्यासह आदिंच्या पथकाने या दरोडेखोरांचा माग काढत अरणगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने अरणगाव परिसरात त्यांना पकडले.

यावेळी पोलिसांनी पोलिसी खाक्‍या दाखवताच पकडलेल्या तीन दरोडेखोरांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान रात्री उशीरा फैय्याज शेख यांच्या फिर्यादीवरून कमलेश रविंद्र साळवे (वय. 27, रा. आंबेडकरनगर, राशीन) अनिकेत गोविंद भोसले (वय.20, रा. गोजुबावी, ता. बारामती) व आनंद राजु लोंढे (वय. 33, रा. लोंढे हॉस्पिटल), स्वप्नील उर्फ बबलू भिसे, व त्याचा मित्र (नाव माहीत नाही) या पाच जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)