कोरेगाव शहराला नगरविकास विभागाकडून झुकते माप राहिल

आढावा बैठकीत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना विश्‍वास

कोरेगांव  – राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी कोरेगांवकरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोरेगांव शहराला विकास निधींमध्ये राज्याच्या नगर विकास विभागाकडून झुकते माप राहिल असा विश्‍वास राज्याचे नगर विकास, गृह (शहरे), कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री नामदार डॉ. रणजीत पाटील यांनी दिला आहे. कोरेगांव शहरात नगरपंचायतीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध वैशिष्ठ्यपूर्ण विकासकामां संदर्भात मंत्रालयाच्या नगरविकास विभागामध्ये आयोजित आढावा बैठकीमध्ये डॉ. पाटील बोलत होते. नगर विकास विभागाचे सह सचिव पां. जो. जाधव, खाजगी सचिव श्‍यामकांत म्हस्के यांच्यासह कोरेगांवचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, मुख्याधिकारी पुनम कदम- शिंदे, नगरसेवक महेश बर्गे, राहुल बर्गे, सुनिल बर्गे, राहुल प्र. बर्गे, रमेश उबाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

नामदार डॉ. रणजीत पाटील पुढे म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोरेगांव शहरात वैशिष्ठ्यपूर्ण कामे राबविण्यासंदर्भात नामदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी सूचना केल्या आहेत, त्या बाबतचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या माध्यमातून कोरेगांव नगरपंचायतीने नगरविकास विभागाला सादर केले आहेत. हे सगळे प्रस्ताव कोरेगांव शहरवासियांच्या दृष्टीने अतिशय निकडीचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कोरेगांवला वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून विकास निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या शहराला विकास प्रवाहात अग्रस्थानी आणण्याचा आमचा निश्‍चीत प्रयत्न असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात सूचविलेल्या कामांना तात्काळ मंजुरी देत असल्याचे आदेशही नामदार डॉ. रणजीत पाटील यांनी पारित केल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगांव नगरपंचायतीने मागणी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कोरेगांव शहराच्या भुयारी गटर योजनेचे सर्वेक्षण व प्रस्तावित कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी 5 कोटी, कोरेगांव शहर पाणी योजना विस्तारीकरणासाठी कठापूर जॅकवेलच्या अत्याधुनिक पंपगृहास 5 कोटी, गावठाण हद्दीतील बंदीस्त ओघळींच्या कामांसाठी 2.50 कोटी, कोरेगाव शहराच्या बाह्यवळण मार्गातील जुना पालखी रस्ता करणेसाठी 3 कोटी, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या प्रभाग क्र. 8 मधील विकासकामांसाठी 50 लक्ष, नगरसेवक महेश बर्गेयांच्या प्रभाग क्र. 4 मधील विकासकामांसाठी 50 लक्ष, नगरसेविका सौ. साक्षी सुनिल बर्गे यांच्या प्रभाग क्र. 5 मधील विकासकामांसाठी 50 लक्ष, नगरसेविका सौ. शुभांगी राहुल बर्गे यांच्या प्रभाग क्र. 7 मधील विकासकामांसाठी 50 लक्ष, तर प्रभाग 15 व नगरसेविका सौ. पुनम अमोल मेरुकर यांच्या प्रभाग क्र. 6 मधील विकासकामांसाठी 50 लक्ष अशा 18 कोटींचे विविध प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर केले होते. या सर्व प्रस्तावांसह वैशिष्ठ्यपूर्ण विकास कामांसाठीही निधी देण्याची ग्वाही मंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.

प्रारंभी नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी विकास निधींची मागणी केली, मुख्याधिकारी पुनम कदम- शिंदे यांनी विविध विकासकामांचा आढावा सादर केला. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक महेश बर्गे, सुनिल बर्गे, राहुल बर्गे यांनीही विविध समस्या मांडल्या. राज्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीला नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नगरपंचायतीचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी तात्काळ निधी

कोरेगांव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कठापूर पंपहाऊसच्या विस्तारीकरणासाठी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तात्काळ नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधीतांना देवून 10 कोटी रुपयांचा विशेष निधी वर्ग करण्याचे अभिवचन दिले. पाणी टंचाई भासू नये यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्याच आम्हाला तशा सूचना आहेत, त्यामुळे मागणीच्या दुप्पट निधी देण्याचे मान्य करुन कोरेगांवकरांना एक अनोखी भेट राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)