कासची पातळी 14 फुटांवर, लवकरच ओव्हर फ्लो होणार

कास धरणासह ग्रेड सेपरेटरची नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांकडून पाहणी

सातारा – सातारा शहराची लाइफलाइन असणारा कास तलाव चौदा फूट भरला असून पावसाचा जोर कायम असल्याने दररोज पाणी पातळी पावणेदोन फुटाने वाढत आहे. येत्या चार दिवसात कास तलाव ओव्हरफ्लो होईल अशी खूशखबर पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आली. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, अभियंता दिग्विजय गाढवे, लिपिक नंदू कांबळे, आर. एस. बावणे इ. यावेळी उपस्थित होते.

नगराध्यक्ष माधवी कदम यांनी ग्रेड सेपरेटर, सांबरवाडी फिल्टर प्लॅंट, व कास धरण भिंतीच्या कामाची सकाळी अकरा ते दुपारी अडीचच्या दरम्यान पाहणी केली. ग्रेड सेपरेटरच्या कामाची माहिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. एस. आंबेकर यांनी दिली. पोवई नाका ते सयाजीराव विद्यालय हा ओपन अप 320 फूटाचा असून 5 ऑगस्टपर्यंत पोवई नाका ते शाहू चौक या दरम्यानच्या रस्त्यावर स्लॅब टाकून खडीकरण व पिचिंगचे काम उरकण्यात येणार आहे. त्यामुळे पोवई नाक्‍याचा रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे. लोणार गल्ली ते पोवई नाका व प्रेस्टीज चेंबर्स ते शाहू चौक हे दोन्ही सर्विस रोड मुरूम व खडी टाकून रोलिंग करण्यात येणार आहे.

ग्रेड सेपरेटरचे काम हे फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे आंबेकर यांनी स्पष्ट केले. ठेकेदार टी अँण्ड टी कंपनीचे अधिकारी सुध्दा यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर रोडचे काम 15 मीटरने वाढल्याने तेथील अंदाजपत्रक पुन्हा चार कोटीने वाढले असून ओपन अप हा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीच्या गेटला खुला होणार आहे. ड्रेनेज सिस्टिमच्या काही त्रुटींची नगराध्यक्षांनी भूविकास बॅंक चौकात पाहणी केली.

येथे फक्त सत्तर पाण्याचा निचरा होतो बाकी पाणी तुंबते अशी तक्रार नगरसेवक राजू भोसले यांनी केली होती. मात्र या चौकात निचरा न होणारे पाणी अन्यत्र वळवण्यासाठी तेथील गटार बंद करून ते पाणी उजव्या गटारातून पारंगे चौकाच्या पलीकडे वाहून नेण्याचे नियोजन करण्यात आले. पोवई नाक्‍यावरील कॉंक्रिट स्लॅबची नगराध्यक्षांनी पाहणी करून जिल्हा रुग्णालय मार्ग तातडीने खुला करण्याची मागणी केली. येत्या चार दिवसात स्लॅब टाकून हा रस्ता येत्या पाच दिवसात खुला करण्याचे आश्‍वासन अभियंता आंबेकर यांनी दिले.

कास चार दिवसांत भरणार
पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. एस. मोमीन यांनी कास तलावाचा पाणी साठा चौदा फूटावर असून स्केलगेज प्रमाणे ओव्हरफ्लो हा बावीस फुटाचा आहे. येत्या चार दिवसात कास ओव्हर फ्लो होण्याचे संकेत दिले. कास धरण उंचीचे काम 85 टक्के पूर्ण झाले असून पुढच्या पावसाळी हंगामात कास तलावाचा पाणीसाठा107 दलघमी वरून 445 दलघमी वर जाणार आहे. कास धरण उंचीचे काम निधीसाठी रखडले असून पालिकेकडून साडेतीन कोटी व राज्य शासनाकडून बावीस कोटी असे पंचवीस कोटी रुपये येणे आहे. हा निधी वेळेत उपलब्ध झाल्यास कास धरणाचे काम फेब्रुवारी 2020 पूर्ण होणार आहे.

फिल्टर बेडमुळे सातारकरांना स्वच्छ पाणी
मंगळवारी पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सांबारवाडी येथील अडीच लाख लीटर क्षमतेचे फिल्टर बेड पंधरा कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केले. अडीच लाख लीटर क्षमतेचा सेटलिंग टॅंकचा सगळा गाळ धूवून टाकण्यात आला तसेच फिल्टरेशन यंत्रणेच्या वॉलचे ग्रिसिंग व मेंटेनन्स हाती घेण्यात आला. एरव्ही पावसाने जोर पकडण्यापूर्वीच गाळ उपसण्याचे काम सुरू झाल्याने सातारकरांनी समाधान व्यक्त केले आहे. नगराध्यक्षा माधवी कदम व श्रीकांत आंबेकर यांनी या कामाची माहिती घेतली. फिल्टर बेडमुळे पाणी वाळू गाळणीतून पुढे सरकून पॉवर हाऊसच्या टाकीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)