निकालानंतर 30 दिवसांत उर्वरित खर्च सादर करणे बंधनकारक
नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी 18 एप्रिलपर्यंत खर्च सादर केला असून, 19 उमेदवारांपैकी सर्वाधिक खर्च भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी 51 लाख 89 हजार 289 रुपये खर्च केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी 42 लाख 40 हजार 846 रुपये खर्च केला. या 19 उमेदवारांपैकी खर्चाच्या बाबतीत विखे अव्वल ठरले असून दोन्ही उमेदवारांचा झालेला हा खर्च निवडणूक आयोगाने मान्य केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी निवडणूक विभागाने स्वंतत्र कक्ष स्थापन केले होते. यामध्ये उमेदवाराला 70 लाखांची खर्च मर्यादा घालून दिली होती. या मर्यादेच्या अधिन राहून उमेदवारांनी खर्च 18 एप्रिलपर्यंत खर्च सादर केला आहे. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्चामध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी 1 एप्रिल ते 18 एप्रिलदरम्यान घोषित केलेला खर्च 51 लाख 89 हजार 289 रुपये दाखवला असून तो विखे यांनी मान्य केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी घोषित केलेला खर्च 42 लाख 40 हजार 846 रूपये आहे. या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च मान्य केला आहे.
भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे आदी नेते मंडळीच्या नगर दक्षिण मतदार संघात घेण्यात आलेल्या सभा व वाहनावरील खर्च झाला असल्याचे दाखविले आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवरांच्या जाहीर सभांवर खर्च झाल्या असल्याचे सांगत दोन्ही उमेदवारांनी निवडणुकी दरम्यान प्रचार सभा, वाहनावरील खर्च, जेवण, मंडप, लाइट डेकोरेशनवरील खर्च केला असल्याचे सांगितले आहे.