विदेशरंग : अमेरिकेला धोका चीनी वर्चस्वाचा!   

देविदास देशपांडे 

हूवेई आणि झेडटीई या चिनी कंपन्यांपासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह्जने 2012 मध्येच जाहीर केले होते. या दोन्ही कंपन्यांवर लाचखोरी आणि हेरगिरीचा आरोप आहे. चीनचे हे प्रयत्न केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाहीत. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये चीन हातपाय पसरण्याच्या बेतात आहे, असे या अहवालात म्हटले आहे. आशिया आणि युरोपमध्ये तर हे प्रयत्न जरा जास्तच तीव्रतेने सुरू असल्याचे दिसते. 

चीनने आपल्या आर्थिक ताकदीच्या जोरावर अमेरिकेच्या मर्मस्थानीच आघात केला आहे. गेल्या महिन्यात समोर आलेल्या एका घटनेने हा आघात अधिक स्पष्ट होतो. चीनची बलाढ्य कंपनी अलिबाबाचा संस्थापक जॅक मा हा जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असून चीनमधील सर्वात श्रीमंत माणूस आहे. मात्र हा जॅक चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य असल्याचे उघड झाले आहे. कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र “पीपल्स डेली’ने जॅक मा याच्या कम्युनिस्ट पक्षाशी असलेल्या संबंधांवर प्रकाशझोत टाकला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कम्युनिस्ट पक्षात सामील होणारा जॅक मा हा पहिलाच अतिश्रीमंत भांडवलदार नाही. बांधकाम व्यावसायिक शू जिआयिन आणि वांडा समूहाचे संस्थापक वांग जिआनलिन हेही पक्षाच्या अब्जाधीश सदस्यांपैकी आहेत. मात्र जॅक मा हा पक्षाचा सदस्य असल्याचे आतापर्यंत समोर आले नव्हते. जॅक मा हा पक्षसदस्य तर होताच, पण शी जिनपिंग यांच्या “बेल्ट आणि रोड’ व्यापार प्रकल्पात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

गेल्या वर्षी स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे जागतिक आर्थिक मंचांमधील एका बैठकीत बोलताना वांग जिआनलिन यांनी ट्रम्प यांना एक इशारा दिला होता. चीन आणि अमेरिकेदरम्यान संभाव्य व्यापारयुद्धात मनोरंजन उद्योगाला ओढू नका. या दोन देशांमध्ये व्यापारयुद्ध झाले तर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसेल, असे वांग म्हणाले होते. त्यावेळी हॉलिवूडमध्ये चीनच्या वाढत्या गुंतवणुकीची तपासणी करावी, कारण त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका संभवतो, अशी मागणी अमेरिकी संसदेच्या अनेक सदस्यांनी सरकारकडे केली होती.

जिआनलिन यांच्या वांडा उद्योगसमुहाकडे अमेरिकेतील एक चित्रपटगृह शृंखला, हॉलिवूड निर्मिती कंपनी आणि गोल्डनग्लोब ऍवार्ड आयोजित करणाऱ्या कंपनीची मालकी आहे. जगभरात कमाईचे विक्रम करणाऱ्या “बॅटमॅन’ मालिकेतील तीन चित्रपटांची निर्मिती करणारी लिजेंडरी एन्टरटेन्मेंट ही कंपनीही त्यांनी खरेदी केलेली आहे. हॉलिवूडमधील सहा मोठ्या कंपन्या विकत घेण्यातही त्यांनी रस दाखवला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे चीनशी व्यापार युद्ध सुरू केले असतानाच चीन छुप्या मार्गाने अमेरिकेवर प्रभाव टाकत आहे. खुद्द अमेरिकेतील तज्ञांनी हा इशारा दिला आहे. अमेरिकी राजकारण आणि समाजाला प्रभावित करण्यासाठी चीनने व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर निधी पुरवठा केलेले प्रयत्न सुरू केले आहेत, असे या संबंधातील नवीन अहवालात म्हटले आहे. “चायनीज इन्फ्लुएंन्स अँड अमेरिकन इंटरेस्ट्‌स’ असे या अहवालाचे नाव आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील हूव्हर इन्स्टिट्यूशन आणि एशिया सोसायटी नावाच्या संस्थेतील सेंटर ऑन यूएस-चायना रिलेशन्स या संस्थांतील तज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे. लॅरी डायमंड आणि ऑरव्हिल शेल यांनी अहवालाचे लेखन केले आहे.
कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस म्हणून शी जिनपिंग 2012 मध्ये सत्तेवर आले तेव्हापासून चीनचे हे प्रयत्न सुरू झाले, असे त्यांचे म्हणणे आहे. चीनला आपला प्रभाव निर्माण करायचा आहे, तसेच जगातील उदार लोकशाही देशांपेक्षा आपले आर्थिक विकासाचे मॉडेल अधिक कार्यक्षम असल्याचे दाखवून द्यायचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी चीन अन्य कशापेक्षाही अमेरिकेच्या खुलेपणाचाच वापर करून घेत आहे अन्‌ दुसरीकडे, चिनी समाजात प्रवेश मिळविण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना खीळ घालत आहे.

अमेरिकेचे चीनमधील माजी राजदूत विन्स्टन लॉर्ड यांनी हा अहवाल लिहिण्यास मदत केली आहे. हा अहवाल सध्याच्या अमेरिका-चीन संबंधाची सध्याची एकंदर स्थिती दाखवतो. अमेरिका-चीन संबंधातील अशुभ गोष्टींचे प्रतिबिंब त्यात पडले आहे, असे त्यांनी नुकतेच व्हॉईस ऑफ अमेरिकेशी बोलताना सांगितले.

हे निष्कर्ष काढण्यासाठी अहवालात जी उदाहरणे देण्यात आली आहेत, ती महत्त्वाची आहेत. अमेरिकी राजकारण्यांवर आणि अमेरिकी कॉंग्रेसच्या सदस्यांवर चीनला जास्त प्रभाव टाकायचा आहे. संसद सदस्यांशी संबंधित मुद्यांवर मार्ग काढण्यासाठी 2017 मध्ये 3.8 अब्ज डॉलर खर्च केले असल्याचे चिनी कंपन्यांनी मान्य केले आहे. अन्‌ ही केवळ अधिकृत आकडेवारी आहे. याशिवाय अमेरिकी निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी चीनने खासगी कंपन्यांचीही मदत घेतली आहे. वांग वेनलिआंग या चिनी उद्योगपतीने व्हर्जिनियाचे गव्हर्नर टेरी मॅकऑलिफ यांच्या प्रचारासाठी 1,20,000 डॉलरची रक्कम दिली होती. चिनी-अमेरिकी नागरिकांच्या चीनमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांवर दबाव आणून आपल्या टिकाकारांना शांत करण्याची किंवा तैवानला पाठिंबा न मिळण्याची व्यवस्थाही चीनने केली आहे.

अमेरिकी समाजावर दबाव टाकण्याचा चीनचा एक मार्ग म्हणजे शिक्षण. चीनने संपूर्ण अमेरिकेत महाविद्यालयांमध्ये 110 कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट उघडल्या असून माध्यमिक शाळांमध्ये 501 कन्फ्यूशियस वर्ग उघडले आहेत. या संस्था विद्यार्थी आणि नागरिकांना चिनी भाषा आणि संस्कृती शिकवतात. या वर्गांमध्ये कम्युनिस्ट पार्टीने मंजूर केलेल्या साहित्याचाच वापर करावा लागतो. तसेच तिबेट, तिआनमेन चौक, झिंजियांग, फालुन गॉंग किंवा मानवाधिकारांवर चर्चा करण्यास सक्त मनाई आहे. या बंधनामुळे शिकागो विद्यापीठ, पेन स्टेट युनिव्हर्सिटी आणि टेक्‍सास एअँडएम यांच्यासह अनेक विद्यापीठांनी या संस्था बंद केल्या आहेत.

दुसरीकडे, 2017-2018 या शैक्षणिक वर्षात, 3 लाख 50 हजार 755 चिनी विद्यार्थ्यांनी अमेरिकन विद्यापीठांमध्ये प्रवेश केला आणि आणखी 80,000 विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला. मात्र यातील काही चिनी विद्यार्थी आणि विद्वानांच्या संघटनांवर अन्य चिनी विद्यार्थी व अमेरिकी शिक्षकांची हेरगिरी करण्याचे आरोप करण्यात आले होते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅंडमध्ये गेल्या वर्षी यांग शुपिंग या विद्यार्थिनीने पदवी प्रदान समारंभात भाषण केले होते आणि चीनच्या तुलनेत अमेरिकेतील खुल्या अभिव्यक्तीच्या ताज्या हवेची तारीफ केली होती. तिची ही टिप्पणी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आली. तिला नंतर धमक्‍यांचे ईमेल आले आणि चीनमधील तिच्या कुटुंबाचा छळ करण्यात आला.

चीनने परदेशातील प्रचाराची महामोहीम सुरू केली आहे. सरकारी मालकीच्या झिन्हुआ वृत्तसंस्थेचा विस्तार करण्यात आला. चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क या वाहिनीचे कार्यक्रम सात भाषांमध्ये प्रसारित होतात. मात्र चीन सरकारने देशामध्ये अमेरिकी आणि अन्य पाश्‍चात्य माध्यम संस्थांना प्रतिबंधित केले आहे. चीनमध्ये काम करताना छळ आणि शारीरिक मारहाण झाल्याची तक्रार अनेक परदेशी पत्रकारांनी केली आहे. हाच प्रकार उद्योग क्षेत्रातही दिसतो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)