चेन्नई – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेले “गाजा’ हे चक्रिवादळ तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने सरकात आहे. कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा दरम्यान 15 नोव्हेंबर रोजी हे चक्रिवादळ थडकण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सध्या “गाजा’चक्रिवादळ चेन्नईच्या ईशान्येकडे 860 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 12 किलोमीटर वेगाने सरकत आहे. आगामी 24 तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रिवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे तामिळनाडू, पॉंडेचेरी आणि आंध्रप्रदेशात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात 14 नोव्हेंबरच्या रात्रीपासून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे “एरिया सायक्लॉन वॉर्निंग सेंटर’चे संचालक एस. बालचंद्रन यांनी सांगितले. मच्छिमारांनी 12 नोव्हेंबरपासून समुद्रात न जाण्याची सूचनाही देण्यात आली आहे. दरम्यान तामिळनाडू आणि आंध्रच्या किनाऱ्यावर येईपर्यंत वादळाचा जोर क्षीण होईल, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने म्हटले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा