गावाकडच्या दुष्काळाच्या झळांनी ‘त्या’ तरुणांना बनवले चोर

-शेतात पाईप लाईन करण्यासाठी त्यांनी चोरला पाईपांनी भरलेला टेम्पो

-उस्मानाबाद जिल्ह्यातील मुळ येरमाळा व वाशी च्या तीन तरुणांना अटक

पिंपरी – गावाकडे पडलेला प्रचंड दुष्काळ, त्यामुळे बिघडलेली आर्थिक गणिते ही कारणे दुष्काळग्रस्त भागातील तरुणांना आता टोकाचे पाऊल टाकायला लावत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. गावाकडे दुष्काळ पडल्याने आता आपल्या कोरडवाहू शेतीत काही तरी करायला हवे या विचाराने शेतात पाईप लाईन करण्यासाठी मुळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील रहीवाशी असलेल्या व सध्या येरवडा व खेड तालुक्‍यात वास्तव्यास असलेल्या तिन तरुणांनी चक्क पाईपांनी भरलेला टेम्पो चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरी करणाऱ्या तिघांनाही पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने पकडल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

अमोल विक्रम मोरे (वय-20 रा. बिडी कामगार वसाहत, गणेशनगर, येरवाडा), समाधान त्रिंबक दौंड (वय-23 रा. बिडी कामगार वसाहत, गणेशनगर, येरवाडा) व संदिप राजेंद्र मोरे (वय-25 रा. शिक्रापुररोड, शेलपिंपळगाव ता. खेड) या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, आरोपी संदीप मोरे हा सध्या मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातील रहीवाशी असून तो सध्या खेड तालुक्‍यातील शुक्रापुररोड येथील शेलपिंपळगाव येथे वास्तव्यास आहे. यावर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते पुर्णत: बिघडली आहेत. आरोपी संदीप मोरे याच्या गावाकडील शेतातही दुष्काळमुळे नापीकी येवून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गावाकडच्या शेतात पाईपलाईन करुन शेती बागायत करायचा विचार करत होता.

मात्र, अगोदरच अर्थिक गणित बिघडल्यामुळे शेतासाठी अधिकचे पैसे खर्च करता येत नव्हते. अशातच संदीप याला दि. 6 जून रोजी रात्री तो सध्या रहात असलेल्या शुक्रापुर रोडवर एक पाईपाने भरलेला टेम्पो भरलेला दिसला. पाईपाने भरलेला टेम्पो पाहील्यानंतर त्याने त्याचे फोटो काढून येरवाडा येथील इतर 2 मित्रांना मोबाईवरुन पाठवले. गावाकडील शेतात पाईपलाईन करण्यासाठी हे पाईपाने भरलेला टम्पो चोरण्याचा प्लान सांगीतला.

त्यानूसार, अमोल मोरे व समाधान दौंड यांनीही लगेच राजी होत हा टेम्पो चोरण्याचा प्लॅन आखला. तिघांनी संगणमत करुन रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास शुक्रापुर रोडवरुन जाणाऱ्या टेम्पोला मोटारसायलक आडवी लावून टेम्पो रोखला. व तिघांनी आम्ही फायनान्स कंपनीचे लोक असून तुमच्या टेम्पोचा हप्ता थकलेला आहे असे सांगून हा टेम्पो पळवून नेला होता.याप्रकरणी टोम्पोचालक भास्कर लांडगे यांनी चाकण पोलीसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तपासाला सुरवात केली होती. चाकण पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना बातमीदारामार्फत संशयीत लोकांनी नावे मिळाली. त्यावेळी पोलिसांनी येरवडा येथील गणेशनगर येथील बिडी कामगार वसाहत येथे सापळा रचुन अमोल मोरे व समाधन दौंड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांचा तिसरा साथीदार संदिप मोरे याचे नाव समोर आले त्यानंतर पोलिसांनी संदिप याला शेलपिंपळगाव येथून ताब्यात घेवून अटक केली.

या तिघांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरुन नेलेला हा टेम्पो आरोपींनी रातोरात उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा व वाशी गावाच्या हद्दीमध्ये नेवून तेथे लपवून ठेवला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा व वाशी तालुक्‍यातील दळवेवाडी येथे जावून गुन्ह्यातील टेम्पो व 900 फेनोलेक्‍स पाईप असा 11 लाख 29 हजार 512 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सपोनि गणेश पाटील, पोउपनि काळूराम लांडगे, प्रमोद वेताळ, राजेंद्र शेटे, अमित गायकवाड, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सचिन मोरे, सुनिल चौधरी, प्रमोद हिरळकर यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)