महाबळेश्वर – महाबळेश्वर-मेढा या मुख्य रस्त्यावरील माचूतर गणेश मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे पंधरा हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी पुजारी रमेश प्रकाश जंगम यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी याच गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली होती.
अधिक माहिती अशी, मंदिराचे पुजारी रात्री मंदिरास कुलूप लावून घरी जातात व दुसऱ्या दिवशी नियमितपणे सकाळी पुन्हा मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडले जाते. आज सकाळी 7.30 च्या सुमारास मंदिरातील पुजारी रमेश जंगम (वय 30, रा. मोळेश्वर) हे मंदिर उघडण्यासाठी आले असता मंदिरातील मुख्य शटरचे कुलूप तोडलेले दिसले व मंदिर उघडेच असल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला असून पो. हवा चंद्रकांत तिटकारे पुढील तपास करीत आहेत.